उल्हासनगर : आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या आक्रमक झालेल्या आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि तातडीने कारवाईची मागणी केली.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्येच हा गोळीबार झाला होता. या प्रकरणाची माहिती विधीमंडळाला प्राप्त झाली आहे, तर गायकवाडांना कोर्टाने शिक्षा ठोठावल्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेनेचे मंत्री आक्रमक
भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावरून शिवसेनेचे मंत्री आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी शिवसेनेच्या ७ मंत्र्यांनी देवेद्र फडणवीसांची भेट घेतली. गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असून देवेद्र फडणवीसांनी तातडीने गणपत गायकवाड यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेच्या मंत्र्यांनी मांडली.