धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिर अपहारप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग, जिल्हा पोलीस प्रमुख शंकर केंगार यांचा २२ सप्टेंबर २०१७ चा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात सादर करण्यात आला. त्यानुसार उच्च न्यायालयाने मंदिरात ८.५ कोटीचा अपहार केल्याप्रकरणी ९ मे २०२४ दिवशी संबंधित १६ आरोपींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र या आदेशाचे अद्यापही पालन झालेले नसल्यामुळे हिंदु जनजागृती समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात अवमान याचिका प्रविष्ट केलेली आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार तात्काळ फौजदारी गुन्हे नोंद करण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीने एका निवेदनाद्वारे धाराशिव पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्याकडे केली आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे विनोद रसाळ, श्रीतुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे, अधिवक्ता शिरीष कुलकर्णी आणि पुजारी अमित कदम इत्यादी उपस्थित होते.
या अपहारप्रकरणी दोन स्वतंत्र चौकशी अहवाल न्यायालयासमोर ठेवण्यात आले. त्यापैकी पोलीस प्रमुख लता फड यांनी सादर केलेल्या अहवालात सर्व आरोपीना निर्दोष मुक्त करण्यात आले होते. हा अहवाल फेटाळण्यात आला असून शंकर केंगार यांनी सादर केलेल्या अहवालानुसार उच्च न्यायालयाने सर्व १६ आरोपींवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश दिले.
हा आदेश देऊन ३ महीने उलटले असून अद्याप संबंधितांवर फौजदारी गुन्ह्यांची नोंद झालेली नाही. त्यामुळे अधिक वेळ न दवडता न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. या वेळी अधीक्षक संजय जाधव म्हणाले की, उच्च न्यायालयाने जिल्हाधिकार्यांना कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांच्याकडून सूचना प्राप्त झाल्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल.