परभणी : हिंदू युवा वाहिनी संघटनेच्या नाशिक येथील प्रथमेश संदीप चव्हाण याने एक पत्रक काढून काळाराम मंदिर जवळ कुठेही तुमचा निळा, पिवळा झेंडा लावू नये. तसे केल्यास पाठीवर पुन्हा झाडू आणि गळ्यात मडके देण्यात येईल असे वादग्रस्त व जाती जातीमध्ये तणाव आणि दंगल निर्माण करणारे वक्तव्य प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून केले आहे. या प्रकरणी तात्काळ दखल घेवून हिंदू युवा वाहिनीवर बंदी घालून वादग्रस्त वक्तव्य करणा-या प्रथमेश चव्हाण याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे भिमशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, चव्हाण याने जो कुणी परत निळा झेंडा हातात घेवून दिसेल त्याला वाळीत टाकण्यात येईल अशी भाषा वापरली आहे. महाराष्ट्रातील समाजा समाजामध्ये यामुळे तणाव व तेढ निर्माण होऊ शकते. त्यामुळे चव्हाण याच्यावर अॅट्रासिटी अॅक्ट व इतर कलान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा व हिंदू युवा वाहिनीवर तात्काळ बंदी घालावी. अन्यथा येणा-या काळात भिमशक्तीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात संबंधित संघटनेवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनावर भिमशक्तीचे नेते प्रा. प्रविण कनकुटे, जिल्हाध्यक्ष सतिश भिसे, शहराध्यक्ष विक्रम काळे, ता. अध्यक्ष राहुल कनकुटे, दिपक कनकुटे, संजय वाव्हळे आदिंच्या स्वाक्षरी आहेत.