परभणी : समस्त हिंदू धर्मांचे आराध्य दैवत श्री प्रभू रामचंद्र यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दि. २२ जानेवारीला भव्य दिव्य असा साजरा होत आहे. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. संपूर्ण नागरिकांचे या सोहळ्याकडे लक्ष लागले आहे. हा सुवर्ण क्षण आयुष्यभर डोळ्यात साठविण्याकरिता सर्व जण प्रयत्नशील आहेत. त्यामुळे विशेष अधिकार अंतर्गत सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र नव निर्माण सेना यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शाळेतील मुले व उच्च शिक्षण घेणा-या आजच्या युवा पिढीला हा क्षण पाहण्याचे भाग्य मिळत आहे व हे भाग्य सार्थ करण्यासाठी महाराष्ट्र शासन राजकीय सेवा विभागाच्या दि. १६/०१/१९५८ च्या शासन निर्णयानुसार आपणांस असलेल्या विशेष अधिकार अंतर्गत आपण दि. २२ जानेवारीला शासकीय/निमशासकीय सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यास समस्त कर्मचारी वर्गाला व युवा पिढीला हा सोहळा बघता येईल. त्यामुळे सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष मनसे रुपेश देशमुख, जिल्हासंघटक श्रीनिवास लाहोटी, मनवीसे जिल्हाध्यक्ष अर्जुन टाक, तालुका संघटक मनवीसे लखन गरुड, उप शहराध्यक्ष मनविसे श्रीकांत पाटील, महाराष्ट्र सैनिक तेजस संघई, आशिष जैन, अक्षय टाक, सूर्यकांत मोगल आदिंची नावे आहेत.