27.6 C
Latur
Monday, May 27, 2024
Homeमहाराष्ट्रनाशकात शांतिगिरी महाराजांचे शक्तिप्रदर्शन

नाशकात शांतिगिरी महाराजांचे शक्तिप्रदर्शन

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या नाशिकचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, शरद पवार या दिग्गज नेत्यांच्या त्यांच्या उमेदवारांसाठी सभा होत असताना दुसरीकडे शांतिगिरी महाराज देखील मागे नाहीत. एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडी नेत्यांच्या सभेसाठी गर्दी जमविण्याचे नियोजन करत आहे. तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली.

त्र्यंबकेश्वर परिसरात शांतिगिरी महाराजांच्या प्रचारार्थ रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. ‘लढा राष्ट्रहिताचा.. संकल्प शुध्द राजकारणाचा’, असा नारा देत शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. हेमंत गोडसे, शांतिगिरी महाराज की राजाभाऊ वाजे? नाशिकमधून कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शांतिगिरी महाराजांकडून जाहीरनामा प्रसिद्ध
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शांतिगिरी महाराजांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात शांतिगिरी महाराजांकडून अनेक मोठी आश्वासने देण्यात आली आहेत.

शेतकरी प्रश्नांना प्रथम प्राधान्य
मतदारसंघात शेतकरी विकास केंद्र उभारणार, मालाला हमीभाव, २४ तास वीज आणि पाणी सुविधा देणार.

नागरी सुविधा
अनेक प्रश्नांचा वेध घेण्यासाठी पुढील २५ वर्षांचा विचार करून आराखडा, वाहतूक कोंडी सोडवणार
उद्योग : नाशिकच्या तरुणांना शिक्षण झाल्यावर नोकरीसाठी बाहेर जावे लागणार नाही, आयटी पार्कचा पाठपुरावा करू, स्टार्ट अपसाठी प्रयत्न करणार.

कनेक्टिव्हिटी
शिक्षण, योग आणि संस्कृत विद्यापीठ उभारणार, तीर्थक्षेत्र विकास करणार, आध्यात्मिक पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, आदर्श कुंभमेळा व्हावा यासाठी प्रयत्न.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR