नवी दिल्ली : पुढील दोन दिवस देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या बुलेटिननुसार, या राज्यांमध्ये दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचा समावेश आहे.
आयएमडीनुसार ३० आणि ३१ डिसेंबर रोजी जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका पाऊस किंवा हिमवृष्टीची शक्यता आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू आणि केरळमध्ये ३१ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत हलका पाऊस पडू शकतो. उत्तर प्रदेशात दाट धुक्यामुळे झालेल्या रस्ते अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. गुरुवारच्या अॅडव्हायझरीमध्ये, हवामान खात्याने लोकांना रस्त्यावर कोणत्याही मार्गाने प्रवास करताना फॉग लाइट्स वापरण्याचा सल्ला दिला आहे.
विमानतळावरून ६० उड्डाणे वळविली
दाट धुक्यामुळे गेल्या तीन दिवसांत दिल्ली विमानतळावरील सुमारे ६० उड्डाणे अन्य शहरांच्या विमानतळांवर वळवण्यात आली आहेत. २५ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ ते २८ डिसेंबरच्या सकाळी ६ वाजेपर्यंत ५८ उड्डाणे वळवण्यात आली आहेत. धुक्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांसह सुमारे १३४ उड्डाणे प्रभावित झाली. दिल्लीहून ३५ आंतरराष्ट्रीय विमानांचे टेकऑफ आणि २८ आंतरराष्ट्रीय विमानांचे लँडिंग विलंबाने झाले. त्याच वेळी, ४३ देशांतर्गत उड्डाणांचे टेकऑफ आणि २८ देशांतर्गत उड्डाणांचे लँडिंग विलंबाने झाले.