27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्र‘लाडकी बहीण’ कोणाची?

‘लाडकी बहीण’ कोणाची?

- श्रेयवादावरून महायुतीत रस्सीखेच - १८ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री फडणवीस साधणार महिलांशी थेट संवाद

मुंबई : प्रतिनिधी
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या श्रेयवादावरून महायुतीमध्ये आता चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करून भाजपही मैदानात उतरला आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर पोस्ट करत योजनेची माहिती देत १८ ऑगस्ट रोजी राखीपौर्णिमेनिमित्त महिलांना संबोधित करणार असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, आतापर्यंतच्या योजनांमध्ये सर्वांत जास्त गाजलेली लाडकी बहीण योजना महायुती सरकारच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची योजना असून ही योजना लोकांसमोर पोहोचवण्यासाठी व या योजनेचे श्रेय आपल्याच पक्षाला मिळावे यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मुख्यमंत्र्यांचा चेहरा पुढे केला तर अजितदादांनी चक्क गुलाबी वादळ आणलं. लाडकी बहीण योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आता भाजपही मैदानात उतरला आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर पोस्ट करत भाजपच्या या नवीन उपक्रमाची माहिती दिली आहे.

‘स्त्रीसक्षमीकरण हा ध्यास घेऊन केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील महायुती सरकार व विशेषत: भारतीय जनता पार्टी अहोरात्र मेहनत घेत आहे. विविध योजना व उपक्रमांद्वारे स्त्रीला सशक्त करण्याचे काम पक्ष व सरकारद्वारे आम्ही करत आहोत.’

येत्या राखी पौर्णिमेला १८ ऑगस्ट रोजी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस ‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ या उपक्रमाद्वारे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत. राज्यातील सर्व माता-भगिनींना विनंती आहे की, आपण सर्वांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. तसेच, माझी भाजपा कार्यकर्त्यांना विशेषत: भाजपा महिला मोर्चाला विनंती आहे की, या उपक्रमाची जबाबदारी घेऊन आपण जास्तीत जास्त महिलांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे.

योजनेचे बदलले नाव
सरकारच्या जीआरमध्ये लाडकी बहीण योजनेचे नाव आहे. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना…’ मात्र अजित पवार यांच्या मंचावर किंवा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर मुख्यमंत्री हा शब्दच गायब करत ‘माझी लाडकी बहीण योजना’ केल्याचे पाहायला मिळत असून स्वतंत्ररीत्या ‘जनसन्मान यात्रे’निमित्त श्रेय घेत आहेत.

विरोधकांची टीका
राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही केवळ विधानसभा निवडणुकीसाठीचा जुमला असून, त्यानंतर ही योजना बंद पडणार असल्याचा दावा विरोधकांकडून सतत केला जातो. तर विरोधकांचा हा दावा महायुतीतील नेत्यांकडून खोडून काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू झाले आहेत.

भाजपच्या ‘तिरंगा यात्रा’
भाजपच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर तिरंगा यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात ११ ते १४ ऑगस्ट या काळात प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय तिरंगा यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियान मोठ्या उत्साहात साजरे करत आता लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार करत श्रेय घेण्याच्या प्रयत्नात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR