28.6 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeअंतरराष्ट्रीयमृत्यूदंडाची शिक्षा होऊनही भारतात परतले माजी नौसैनिक

मृत्यूदंडाची शिक्षा होऊनही भारतात परतले माजी नौसैनिक

दोहा : हेरगिरीच्या गंभीर आरोपाखाली भारताचे माजी आठ नौसैनिक कतारच्या तुरुंगात होते. त्यांची आता सुटका झाली आहे. यातले सात नौसैनिक मायदेशी परतले आहेत. कतारहून भारतात दाखल झालेल्या या माजी नौसैनिकांनी मायभूमीवर पाऊल टाकताच ‘भारत माता की जय’चे नारे दिले. कतारहून भारतात आलेल्या भारताच्या या माजी नौसैनिकाने सांगितले की, ‘‘पीएम मोदींच्या हस्तक्षेपाशिवाय हे शक्य नव्हते. भारत सरकारने सतत आमच्या सुटकेसाठी प्रयत्न केले’’ ‘आम्ही १८ महिने प्रतिक्षा केली’ असे दुस-या नौसैनिकाने सांगितले.

आम्ही पीएम मोदी यांचे आभारी आहोत. त्यांचा व्यक्तीगत हस्तक्षेप आणि कतारसोबतच्या समीकरणाशिवाय हे शक्य नव्हते. भारत सरकारने जे प्रयत्न केले, त्या बद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे हा माजी नौदल अधिकारी म्हणाला. दाहरा ग्लोबल कंपनीसाठी काम करणा-या आठ भारतीय नागरिकांच्या सुटकेचे भारत सरकारने स्वागत केले. आठ पैकी सात जण भारतात परतले आहेत. कतारचे राजे अमीर यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे भारत सरकारने म्हटले.

डिसेंबर महिन्यात शिक्षेत बदल
मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात कतारच्या एका कोर्टाने अल दहरा ग्लोबल प्रकरणात अटकेत असलेल्या भारतीय नागरिकांची मृत्यूदंडाची शिक्षा बदलली होती. ही शिक्षा तुरुंगवासात बदलली होती. भारत सरकारने मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात कतारच्या कोर्टात अपील केले होते. ते मान्य करण्यात आल्यानंतर हा निर्णय झाला होता.

कतारच्या ताब्यात कुठले अधिकारी…
कॅप्टन नवतेज सिंह गिल, कॅप्टन बीरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पूर्णेंदु तिवारी, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता आणि नाविक रागेश हे आठ जण कतारच्या ताब्यात होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR