नगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे भाषेच्या मुद्यावरून चांगलेच ट्रोल झाले असे असले, तरी खासदार विखे त्यांच्या भाषेच्या मुद्यावर ठाम आहेत. ‘मला मराठी भाषेचा गर्व आणि अभिमान आहे. संसदेतील कामकाज व्यतिरीक्त मतदारसंघातील कामांसाठी अधिकार्यांशी इंग्रजीतून संवाद साधावा लागतो. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार संसदेत आहेत. भाषेच्या मुद्यावरून मला ट्रोल करण्यापेक्षा त्यांचे खासदार संसदेत कोणत्या भाषेचा वापर करतात, याचा अभ्यास करावा’, असा मुद्दा खासदार सुजय विखेंनी बोलताना उपस्थित केला.
गेल्या पंचवार्षिकला आमदार संग्राम जगताप यांच्याविरोधात निवडणूक लढवताना खासदार सुजय विखेंनी संसदेत इंग्रजी आणि कमीत कमी हिंदी बोलता आले पाहिजे, असे आव्हान दिले होते. खासदार विखेंच्या या भाषेच्या राजकीय गुगलीवर आमदार जगताप पायचीत झाले. हाच जुना बाण खासदार विखेंनी महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्यावर सुरूवातीला वापरला. पण यावेळी खासदार विखेंवर हा बाण उलटला आणि समाज माध्यमांमध्ये ट्रोल झाले.
नीलेश लंकेंनी भाषेच्या मुद्यावरून खासदार विखेंची हवाच काढून घेतली.
आम्हा गरिबांचे झेडपीच्या शाळेतून शिक्षण झाले आहे, असे नीलेश लंके म्हणताच, खासदार विखे समाज माध्यमांवर ट्रोल झाले. नीलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा समारोप शुक्रवारी नगर शहरात झाला. आमदार रोहित पवार यांनी भाषणाचा सुरूवात करताना मराठीतून बोलू की, इंग्रजीतून, असे म्हणत खासदार विखेंना चिमटा काढला. आजही या मुद्यांवर खासदार विखे ट्रोल होत आहे. परंतु खासदार विखे भाषेच्या मुद्यावर आजही आग्रही आहेत.
खासदार सुजय विखे म्हणाले, लोकसभा संसद भवनामध्ये तुम्ही तुमच्या स्थानिक भाषेत बोलू शकता. माझी भाषा मराठी आहे, तर ती मी बोलू शकतो. परंतु संसद भवन व्यक्तिरीक्त दिल्लीतील आयएस आणि इतर अधिका-यांकडून मतदारसंघातील काम करून घ्यायचे म्हटल्यावर तिथे भाषेची अडचण येते. नगर शहराला लष्करी तळ आहे. येथील प्रश्न थेट लष्करी खात्याशी आणि केंद्राच्या अख्यारीत येतात. तसे ते जोडले गेलेत. त्यांच्यासमोर बोलयाचे म्हटल्यावर दोन प्रमुख भाषा येणे गरजेचे आहे. इंग्रजी आणि हिंदी!
लष्करप्रमुख नॉर्थचे असल्यावर त्यांच्यासमोर जिल्ह्याचे प्रश्न मांडायला ट्रान्सलेटर घेऊन जायचे का? दिल्लीत जेवढे आयएस ऑफिसरकिंवा डिफेन्स सेक्रेटरी आहेत, त्यांच्यासमोर प्रश्न मांडताना इंग्रजी आलीच पाहिजे, हे मागील पाच वर्षात मी अनुभवले आहे. किमान कमीत-कमी हिंदी तरी व्यवस्थित आलीच पाहिजे.