मुंबई : प्रतिनिधी
मकर संक्रातीचा सण जवळ आला असून यानिमित्त अनेक ठिकाणी पतंग उडविण्याचा खेळ खेळला जातो. पतंगबाजीला आतापासूनच सुरुवात झाली असून आकाशात विविध रंगाची पतंग उडताना पाहायला मिळत आहेत. परंतु पतंगबाजीसाठी मोठ्या प्रमाणात जीवाला धोकादायक आणि कायद्याने बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा सर्रास वापर होत असून प्रशासन मात्र जुजबी कारवाया करत आहे. कायद्याने बंदी असलेला नायलॉन मांजा राज्यात दरवर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात येतो कुठून, असाच प्रश्न पर्यावरणप्रेमींसह अनेकांना पडला आहे.
आनंदाचे प्रतीक असलेल्या मकर संक्रांतीनिमित्त पतंगबाजीचा खेळ खेळला जातो. यासाठी पारंपरिक मांजाचा उपयोग केला पाहिजे. मात्र, नायलॉन मांजाचा वापर होत असल्याने पतंग उडविण्याची भारी हौस मात्र अनेकांसाठी जीवघेणी ठरत असल्याचे वास्तव सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. इतरांपेक्षा आपलाच पतंग उंच उडावा आणि आपणच पतंगाचे किंग ठरावे या इर्शेतून चक्क प्रतिबंधित नायलॉन मांजा वापरून सर्रास पतंग उडवले जात आहेत. मात्र, घातक मांजामुळे निष्पाप जीवांचा नाहक बळी जात असून अनेक दुचाकीस्वारांच्या गळ््याला इजा झाली तर अनेक बालकांचे हात चिरले आहे. आकाशात उडणा-या पक्ष्यांनादेखील इजा झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बंदी असलेला नायलॉन मांजा दरवर्षी राज्यभरात कसा पोहोचतो, तो बेसुमार कसा विकला जातो, हे प्रश्न अनुत्तरीत राहत आहे.
नायलॉन मांजा विकणा-यांवर पोलिस प्रशासनाकडून जुजबी कारवाया केल्या जात असून प्रशासन ठोस भूमिका घेऊन कारवाई का करत नाही, प्रशासनाकडून चिरीमिरी घेऊन नायलॉन मांजा विक्रीला छुपा पाठिंबा आहे का, असे अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत. सध्या गल्लोगल्ली अनेक मुलांच्या हातात नायलॉन मांजा आणि गुंता झालेल्या नायलॉन मांजा रस्त्यावर पडलेला आढळून येत आहे.
राज्यात मागील महिन्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळताच देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र कायद्याने बंदी असलेला नायलॉन मांजा राज्यभरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्री होत असताना मुख्यमंत्री याची दखल का घेत नाही, असा प्रश्न उपस्थित होत असून संपूर्ण परिस्थिती समोर मांडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता याची दखल घेणार का आणि फडणवीस यांचे प्रशासन आता कामाला लागून कारवाई करणार का, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
मांजाची बंदी फक्त कागदोपत्री
जीवघेण्या नायलॉन मांजावरील बंदी फक्त कागदोपत्रीच मर्यादित असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. नायलॉनचा मांजा जीवघेणा ठरत आहे. म्हणून त्याच्यावर बंदी घातली खरी. परंतु एवढे असतानाही एवढा सर्रासपणे मांजा कसा काय मिळू शकतो. जर सर्रासपणे विकला जात असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दुचाकीस्वाराचा मांजाने गळा कापला
नाशिकच्या वडाळ नाका भागात कामावरून घरी परतत असताना एका दुचाकीस्वाराचा नायलॉन मांजाने गळा कापल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुशरन मोहसीन सय्यद असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्या गळ््याला ४० टाके पडले.