परभणी : परभणी लोकसभा निवडणुकीसाठी काल (दि. ८) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ७ उमेदवारांनी माघार घेतली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ३४ उमेदवार उरले असून या उमेदवारांना चिन्ह वाटप होताच ख-या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. उमेदवारांना चिन्ह जाहीर होताच मंगळवार, दि. ९ एप्रिल रोजी गुढीपाडवा नववर्ष असल्याने महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात परभणी शहरातील बालाजी मंदिरात दर्शन घेऊन केली. यावेळी अन्य नागरिक देखील
गुढीपाडव्यानिमित्त बालाजी मंदिरात दर्शनासाठी आले होते. यावेळी जानकर यांनी उपस्थित भक्तांशी संवाद साधून परभणीतील विकासाच्या प्रश्नावर चर्चा केली. त्यानंतर जानकर यांनी आपला मोर्चा रोकडा हनुमान मंदिराकडे वळवला. या ठिकाणी देखील त्यांनी दर्शन घेऊन उपस्थित भाविकांशी चर्चा केली. त्यानंतर श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णी या ठिकाणच्या मंदिराला भेट देऊन श्री नृसिंहाचे दर्शन घेत विजयासाठी साकडे घातले.
यावेळी इथेही मोठ्या प्रमाणात भाविकांनी जानकर यांच्याशी गप्पागोष्टी केल्या. त्यानंतर दैठणा येथील ठाकूर बुवा मंदिरात जानकर यांनी भेट देऊन दर्शन घेत भाविकांशी संवाद साधला. एकंदरच गुढीपाडवा व नवर्षाचे निमित्त साधून महादेव जानकर यांनी देवदर्शनासोबत आपल्या प्रचाराचा धडाकाही सुरू केला असल्याची कुजबूज यावेळी नागरिकांमधून ऐकावयास मिळाली.