बोरी : बोरीपासून जवळ असलेल्या रिडज (ता.जिंतुर) येथील जगदंबा देवीचे मंदिर हे तुळजापूरचे उपठाणे म्हणून ओळखले जाते. नवरात्रात मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी असते.
परभणी-जिंतूर महामार्गा पासून आतमध्ये ३ किमी अंतरावर रिडज हे गाव आहे. जमीन सपाटीपासुन १०० फूट उंच टेकडीवर प्राचीन काळातील जगदंबा देवीचे मंदिर आहे. महाराष्ट्राच्या कानाकोप-यात अनेक देवीभक्त याठिकाणी दर्शनासाठी येतात. मंदिराला जाण्यासाठी ५० ते ६० पाय-या चढून जावे लागते. येथील प्रत्येक कुटुंबातील नागरिक नवरात्र निमित्त ९ दिवसाचा उपवास करतात. जगदंबा देवी नवसाला पावणारी देवी असून हे देवीचे मंदिर प्राचीन काळातील आहे.
भाविकांना तुळजापूरला जाणे शक्य होत नाही असे भाविक याठिकाणी दर्शन घेऊन आपली इच्छा पूर्ण करतात. रिडज येथील जगदंबा देवी मंदिर हे तुळजापूरचे उपठाणे असल्याचे जेष्ठ नागरिक सांगतात. नवरात्र महोत्सव निमित्त या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून भक्तांनी कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी रिडज यांनी केले आहे.
गावात वापरत नाहीत गादी, पलंग
रिडज गावात बारा महिने गादी पलंगाचा वापर केला जात नाही. विशेष म्हणजे मुलीच्या लग्नात कन्यादान मध्ये गादी, पलंग देण्यात येत नाही. तसेच गावातील नागरिक कामानिमित्त बाहेरगावी आहेत ते सुद्धा गादी व पलंगचा वापर करत नाहीत.