मस्साजोग : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण होऊनही पोलिस तपासाची माहितीच देत नसल्याचा गंभीर आरोप करताना सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज गावच्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले आणि न्यायासाठी आक्रोश केला. यावेळी गावक-यांनी मोठी गर्दी केली होती. आंदोलनामध्ये गावच्या महिलांनीही सहभाग नोंदविला होता. मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या मध्यस्थीने २ तासांनंतर धनंजय देशमुख खाली उतरले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासाबाबत देशमुख कुटुंबीयांना गृहित धरले जात आहे. हत्येला महिना उलटून गेला तरी आजपर्यंत आम्हाला पोलिस अधिकारी भेटले नाहीत. तसेच गुन्हेगारांवर योग्य ती कारवाईही होत नाही, असा आरोप करीत धनंजय देशमुख यांनी आज मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याची आणि प्रसंगी जीव देण्याची भाषा केली होती. त्यामुळे मोबाईल टॉवरजवळ कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला. त्यावेळी कोणालाही न सांगता गनिमीकाव्याने पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केले. आंदोलनाला गावकरीही उपस्थित होते.
बीड पोलिस प्रशासन आणि मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हेही तेथे दाखल झाले. त्यांनी दोन तासांपासून धनंजय देशमुख यांची मनधरणी केली. त्यांना खाली उतरविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु पाण्याच्या टाकीवर गेल्यानंतर एक शिडी काढून ठेवल्याने त्यांच्यापर्यंत पोलिसांना पोहोचणे शक्य नव्हते. त्यामुळे पोलिसांकडून अग्निशमन दलाच्या गाडीला पाचरण करण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांच्या दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख टाकीवरून खाली उतरले. त्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला.
यावेळी आंदोलक महिलांनी मुख्य आरोपी अजूनही मोकाट कसा, त्याला ३०२ च्या कलमाखाली का अटक करण्यात आली नाही? असा संताप सवाल व्यक्त केला. यावेळी जमलेल्या महिलांनी पोलिस प्रशासनाविरोधात आक्रोश व्यक्त करताना बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांच्यावर बांगड्यासुद्धा फेकल्या. संतप्त महिलांनी संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला. एसपींवर संताप व्यक्त करत बांगड्या भेट देण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतोष देशमुख यांची कन्या वैभवीनेसुद्धा पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केले. वैभवीला सुद्धा खाली उतरवण्यात आले.
जरांगेंना मिठी मारून फोडला हंबरडा
मनोज जरांगे पाटील आणि नवनीत कांवत यांच्या तब्बल दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवरून खाली आले. धनंजय देशमुख हे खाली येताच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना मिठी मारत हंबरडा फोडला. यावेळी त्यांनी ज्यांनी माझ्या भावाला कटकारस्थान करून संपवले. त्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी केली.
न्याय मिळेपर्यंत लढणार
माझ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आणि मी सर्व ऑफिसमध्ये जाऊन तपास कुठपर्यंत झाला हे विचारले पाहिजे का, पण माझ्या भावाला न्याय मिळेपर्यंत मी अजिबात मागे हटणार नाही. न्यायासाठी मला जे काही करता येईल ते सर्व मी करेल. मला फक्त न्याय पाहिजे, असे धनंजय देशमुख म्हणाले.