सोलापूर : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे आहेत, असं दिसून येत आहे, त्यामुळे धनंजय मुंडे यांनी शंभर टक्के मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा, अशी अपेक्षा काँग्रेसच्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. त्या म्हणाल्या, संतोष देशमुख खून प्रकरणात मुंडे यांचा शंभर टक्के राजीनामा झालाच पाहिजे, ते या प्रकरणात आहेत, हे पूर्णपणे दिसून येत आहे. काँग्रेसचे सरकार असताना वारंवार जेव्हा राजीनामे मागितले जायचे, तेव्हा नैतिक जबाबदारी घेऊन ते दिले जायचे. त्यावेळी जरी ती लोक दोषी नसले तरीसुद्धा पब्लिक प्रेशरमुळे राजीनामे दिले जायचे. मात्र, हे सरकार अतिशय निगरगठ्ठ आणि अहंकारी आहे, त्यामुळे हे लवकर हलतील असं दिसत नाहीए, असा आरोपही त्यांनी केला.
वाल्मिक कराडला जेलमध्ये दिल्या जाणा-या ट्रीटमेंटबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, लोरेन्स बिष्णोईपासून वाल्मिक कराड यांच्यापर्यंत जे गुन्हेगार आहेत, जे जेलमध्ये बसून लॉबिंग करत आहेत. आमचा महाराष्ट्र पण यूपी, बिहार आणि गुजरातसारखा बनवला जात आहे.
मी जेव्हा बीडला गेले होते, तेव्हा देशमुख यांची मुलगी मला म्हणत होती, ‘ताई मला खूप भीती वाटते, मला ही पोलिस संरक्षणाची गरज आहे आणि सरकार मला अजूनही देत नाही, त्यामुळे तुम्ही विचार करा की किती दहशतीचे वातावरण त्याठिकाणी निर्माण झाले आहे. त्या ठिकाणी गुन्हेगार जेलमध्ये बसून इंटरव् ू देतायेत आणि त्यांच्यासाठी स्टुडिओ सेटअप केला जातोय, असा आरोप त्यांनी केला.
गुन्हेगारांना व्हीआयपी ट्रीटमेंट देत असतील, तर चुकीची एफआयआर दाखल करण्यासाठी पोलिसांवर प्रचंड दबाव टाकला जातोय, डॉक्टरांवर पीएम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव प्रेशर होत असेल तर सामान्य माणसांनी जायचं कुठे? असा सवालही प्रणिती शिंदे यांनी केला. दरम्यान, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे, अशी मागणी आम्ही संसदेत केली आहे. फुले दांपत्यास भारतरत्न नक्की मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असा दावाही खासदार शिंदे यांनी केला.