मुंबई : (प्रतिनिधी)
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे सहकारी वाल्मिकी कराड यांचा सहभाग असल्याने चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंडे यांना पदावरून दूर करावे, या मागणीसाठी विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेतल्याने धनंजय मुंडे यांची कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आज पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या दोघांची तब्बल सव्वातास चर्चा झाली.
एसआयटी चौकशीचा अहवाल येईपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नसल्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतलेली असली तरी, वाढत्या दबावामुळे अजित पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांची जोरदार पाठराखण करताना, कोणतेही पुरावे नसताना त्यांचा राजीनामा मागणे चुकीचे असल्याचा दावा केला.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत. गेले महिनाभर हे प्रकरण राज्यभर गाजत असून राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. परदेशवारी करून परतलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आज मंत्रालयात आले तेव्हा या प्रकरणात ते काय भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अजित पवार यांनी पत्रकारांना शिताफीने टाळले. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या दालनात जाऊन अजित पवार यांची भेट घेतली. तब्बल सव्वा तास या दोघांची चर्चा सुरू होती. पण आपण केवळ नवीन वर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी भेटायला गेलो होतो, आपल्याला मिळालेल्या खात्याचा अहवाल आपण अजितदादांसमोर ठेवला असा दावा धनंजय मुंडे यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना केला.
संतोष देशमुख यांच्या हत्येशी आपला दुरान्वये संबंध नसल्याने राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, असा पवित्रा धनंजय मुंडे यांनी सुरुवातीपासून घेतलेला आहे. अजित पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी करणा-या एसआयटी चा अहवाल येईपर्यंत कोणताही निर्णय घाईघाईने घेतला जाऊ नये, अशी राष्ट्रवादीतील एका गटाची भूमिका आहे. ती अजित पवार मान्य करणार का ? यावर मुंडे यांच्या मंत्रिपदाचे भवितव्य ठरणार आहे.
भुजबळांकडून मुंडेंची पाठराखण
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ धनंजय मुंडेंच्या मदतीला धावून आले असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी अयोग्य असल्याचे सांगत आज भुजबळ यांनी त्यांची पाठराखण केली. मला कुणाची बाजू घ्यायची नाही. पण चौकशी पूर्ण होऊ द्या, एवढेच माझे म्हणणे आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषी असेल त्याला फाशी द्या. पण गुन्हा सिद्ध होईपर्यंत मुंडे यांनी राजीनामा का द्यावा ? असा सवाल भुजबळ यांनी केला. संतोष देशमुख यांचा निर्घृण खून झाला. खून कसा झाला हे आमदार धस यांनी सांगितले तेव्हा अंगावर शहारे आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करून जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणार, असे स्पष्ट केले आहे. त्याआधीच धनंजय मुंडे यांचा राजीनामायोग्य आहे का ? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. तेलगी प्रकरणात माझ्यावर आरोप झाला आणि माझा राजीनामा घेण्यात आला. त्यामुळे, माझे उपमुख्यमंत्री पद गेले, परंतु सीबीआय चौकशीत माझं नावसुद्धा आलं नाही, याची आठवण भुजबळ यांनी सांगितली. मुंडे यांचा राजीनामा घेऊन आपल्याला मंत्रिपद मिळावे,असा विचारही आपल्या मनाला शिवलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जरांगेंच्या टीकेला भुजबळांचे उत्तर
भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावरही टीका केली. जरांगे यांनी धनंजय मुंडेंना थेट धमकी देत त्यांना राज्यात फिरू देणार नाही, असे म्हटले होते. त्यावर बोलताना, इथं लोकशाही आहे, ठोकशाही नाही. जरांगे यांचं उपोषण सोडवायला चारपाच वेळा मुंडे गेले होते, ते एकमेकांना ओळखतात, असे उत्तर छगन भुजबळ यांनी दिले.