जालना : मागील ७० वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न मनोज जरांगे यांनी सोडवला असल्याचा दावा केला जात आहे.असे असतानाच आता धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचा देखील प्रश्न मार्गी लावणार असल्याचे वक्तव्य मनोज जरांगे यांनी केले आहे. एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागल्यावर धनगर आणि मुस्लिमांना आरक्षण कसे मिळत नाही हे पाहतोच, असा इशारा देखील जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
दरम्यान याबाबत बोलताना जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षण मराठ्यांसाठी ज्वलंत मुद्दा आहे. एकदा हा प्रश्न सुटला की, धनगर समाजाला आणि मुस्लिमांना आरक्षण कसे देत नाहीत तेच बघतो. मराठा आरक्षणाचा मुद्दा आता थोडा राहिला आहे.
एकदा प्रमाणपत्र हातात पडू द्या, त्यानंतर मी मोकळाच आहे. धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. मात्र, हा प्रश्न सुटला पाहिजे याबाबत त्यांनी देखील म्हटलं पाहिजे. त्यांनी एकदा म्हटलं, की मग पाहतो सरकार कसे आरक्षण देत नाही, असे जरांगे म्हणाले.