24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeधाराशिवधाराशिवचे तलाठी उत्तमराव तांबे यांना लाच प्रकरणी ३ वर्षाचा कारावास

धाराशिवचे तलाठी उत्तमराव तांबे यांना लाच प्रकरणी ३ वर्षाचा कारावास

शेतक-याकडून घेतली होती पाच हजाराची लाच

धाराशिव : प्रतिनिधी
शेतीचा फेरफार मंडळ अधिका-याला सांगून मंजूर न करण्यासाठी पाच हजार रूपयांची लाच घेतल्याचे सिद्ध झाल्याने आंबेवाडी ता. धाराशिव सज्जाचे तत्कालिन तलाठी उत्तमराव पांडुरंग तांबे यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश एस. गुप्ता यांच्या न्यायालयाने दोन वेगवेगळ्या कलमान्वये पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे. दोन्ही शिक्षा एकाचवेळी भोगायच्या असल्याने त्यांना तीन वर्षाचा कारावास भोगावा लागणार आहे. शेतक-याकडून लाच घेतल्याची घटना २०११ मध्ये घडली होती.

एसीबीच्या पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमराव पांडुगंर तांबे हे धाराशिव तालुक्यातील बावी (कावलदरा) येथील रहिवाशी आहेत. ते भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर ते तलाठी म्हणून राज्य शासनाच्या सेवेत रूजू झाले होते. ते २०११ मध्ये धाराशिव तालुक्यातील आंबेवाडी सज्जा येथे कार्यरत होते. त्यावेळी त्यांच्याकडे रूईभर व कामेगाव या दोन्ही गावांचा अतिरिक्त पदभार होता.

तक्रारदार शेतक-याच्या शेतीचा फेरफार मंजूर न करण्यासाठी तलाठी तांबे यांनी पाच हजार रूपयांची लाच पंचासमक्ष स्विकारली होती. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं १८/२०११ कलम ७, १३(१)(ड) सह १३(२) ला. प्र. अधिनियम, सन १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एसीबीच्या तत्कालिन पोलीस निरिक्षक तथा तपासी अधिकारी अश्विनी भोसले यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला धाराशिव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय क्र. १ राजेश एस. गुप्ता यांच्या न्यायालयात चालला.️ आरोपीचे वकील अ‍ॅड. मिलिंद पाटील व सरकारी अभियोक्ता श्रीमती जोशी यांनी केलेला युक्तीवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी १८ जुलै रोजी या खटल्यामध्ये निकाल दिला.️

न्यायालयाने आरोपी तलाठी उत्तमराव तांबे यांना कलम ७ अन्वये ३ वर्षाची शिक्षा व १० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १५ दिवस कारावासाची शिक्षा सुनावली. कलम १३ (१) (ड), १३ (२) अन्वये २ वर्षे कारावास व १० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १५ दिवस कारावासाची शिक्षा सुनावली. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून एसीबीचे पोलीस निरिक्षक नानासाहेब कदम यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी कर्मचारी पोलीस शिपाई जे. ए. काझी यांनी सहकार्य केले. लाचेच्या प्रकरणात तलाठ्याला शिक्षा झाल्याने सरकारी, निमसरकारी कर्मचा-यांचे धाबे दणाणले आहेत. ज्यांच्यावर लाच प्रकरणी गुन्हा दाखल आहे, ते कर्मचारी धास्तावले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR