परभणी : महाराष्ट्रातील समस्त ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाला लवकरात लवकर कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात यावी. तसेच या महामंडळास १००० कोटी निधीची तरतूद करण्यात यावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी मंगळवार, दि.१३ रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करून अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रातील समस्त ब्राह्मण समाजातील तरुणांना व्यवसाय व उद्योग स्थापन करण्याकरिता तसेच रोजगार निर्माण व्हावे व शिक्षणासाठी आर्थिक मदत ही काळाची गरज आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी दि. १४ डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे शिष्टमंडळ यांच्यासह बैठक घेऊन भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली होती. परंतु या संदर्भात आजपर्यंत काहीही अंमलबजावणी झालेली नाही. ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्या संदर्भात पुन्हा एकदा शासनास आठवण करून देण्यासाठी एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या निवेदनात ब्राह्मण समाजातील तरुणांना व्यवसायिक व शैक्षणिक मदतीसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह तसेच प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक व अध्यात्मिक कार्यसाठी अद्यावत समाज भवन स्थापन करण्यात यावे. ब्राह्मण पुरोहितांना मासिक ५००० रुपये देऊन त्यांना विविध मंदिरात नियुक्ती करण्यात यावी जेणेकरून त्यांचेकडून मंदिरात नित्य पूजा लावण्यात येईल. ब्राह्मण समाजाच्या सुरक्षतेसाठी विशेष कठोर कायदा करण्यात यावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. या धरणे आंदोलनात ब्राह्मण समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.