नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. क्रिकेट वर्तूळ आणि चाहत्यांमध्ये प्रेमाने (गब्बर) म्हणून ओळखल्या जाणा-या ३७ वर्षीय क्रिकेटपटूने आज सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन ही घोषणा केली. धवनच्या या घोषणेमुळे त्याची क्रिकेटमधील एक शानदार कारकीर्द संपली. दरम्यान धवनच्या या घोषणेमुळे त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे.
एका दशकाहून अधिक काळ भारतीय क्रिकेट टीम मधील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व असलेल्या शिखर धवन याने, एक्स पोस्टच्या माध्यमातून भावनिक व्हिडिओ संदेश जारी केला. ज्यात त्याने त्याला मिळालेल्या सर्वांचे सकार्य आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संपूर्ण प्रवासात अतुट पाठिंबा दिल्याबद्दल त्याने त्याचे कुटुंब, बालपणीचे प्रशिक्षक, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांचे आभार मानले. आपल्या कारकिर्दीवर विचार करताना धवनने नमूद केले की भारताचे प्रतिनिधित्व करणे हे एक स्वप्न पूर्ण झाले होते, परंतु आता त्याच्यावर पुढे जाण्याची वेळ आली आहे. असे धवनने आपल्या संदेशात म्हटले आहे.
शिखर धवनची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारर्किद
शिखरने भारतासाठी पहिला एकदिवसीय सामना २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विशाखापट्टणम येथे खेळला होता. त्याने १६७ सामन्यात ६७९३ धावा केल्या आहेत.यात त्याच्या नावावर १७ शतके आणि ३९ अर्धशतके आहेत. तर धवनने ६८ टी २० सामन्यात १७५९ धावा केल्या आहेत. धवनने मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली कसोटी खेळली. २०१३ पासून त्याने आतापर्यंत ३४ कसोटीमध्ये २३१५ धावा काढल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या १९० आहे. धवनने आयपीएलमध्येही खूप धावा केल्या आहेत. या स्पर्धेच्या इतिहासातील तो सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो विराट कोहलीनंतर दुस-या क्रमांकावर आहे. धवनने २२२ आयपीएल सामन्यांमध्ये ६७६९ धावा केल्या आहेत. यात त्याने दोन शतके आणि ५१ अर्धशतके केली आहेत. धवनने १० डिसेंबर २०२२ रोजी बांगलादेशविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.