मुंबई : प्रतिनिधी
आयपीएलमधील १० संघांनी आयपीएलच्या मेगा लिलाव-२०२४ साठी खेळाडू कायम ठेवण्याची यादी जाहीर केली. ५ वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सने ५ खेळाडूंना कायम ठेवले. माजी कर्णधार एमएस धोनी चेन्नईकडून अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने कर्णधार ऋषभ पंतला सोडले. पंत २०१६ पासून दिल्लीसोबत होता. लखनौ सुपर जायंट्सने केएल राहुलला सोडले, कोलकाता नाइट रायडर्सने कर्णधार श्रेयस अय्यरला सोडले आणि बंगळुरूने फाफ डू प्लेसिसला सोडले. यात सनरायजर्सने हेनरिक क्लासेनसाठी तब्बल २३ कोटी रुपये मोजले आहेत. त्यामुळे खेळाडू कायम करण्याच्या प्रक्रियेत तो महागडा खेळाडू ठरला.
मुंबई इंडियन्स संघाने गेल्या वर्षीच्या हंगामापूर्वी एका धक्कादायक निर्णय घेतला. पाच जेतेपद मिळवून देणा-या रोहित शर्माऐवजी मुंबईने हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली. हार्दिकने मुंबई इंडियन्समधूनच आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली. पांड्याने मुंबईच्या जेतेपदांमध्ये मोलाची भूमिका बजावली. त्यानंतर तो गुजरात संघाचा कर्णधार झाला. मात्र, गेल्या वर्षी तो मुंबई संघात परतला.
हार्दिककडेच मुंबई संघाची सूत्रे असल्याने रिटेन्शन यादीत तो आहे. हार्दिक पांड्याला १६.३५ कोटींची रिटेंशन किमत आहे. रोहित शर्मालाही रिटेन केले. त्यालाही १६ कोटी रुपये मोजले. यासोबतच सूर्याला मुंबईने १६.३५ कोटींना रिटेन केले तर तिलक वर्माला ८ कोटी मोजले. यात बुमराहला सर्वाधिक १८ कोटी मोजले.
धोनी अनकॅप्ड खेळाडू
पाच वेळचा आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स संघामध्ये अनेक स्टार आणि दिग्गज खेळाडू आहेत. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्ज कोणाला रिटेन करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, मथिशा पाथिराना, एमएस धोनी आणि शिवम दुबे यांना रिटेन करण्यात आले.
रॉयल चॅलेंजर्सची धुरा पुन्हा विराटकडे?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ नव्याने संघ उभारणी करणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसिसने संघाचे नेतृत्व सांभाळले आहे. त्याचा फिटनेस उत्तम आहे. मात्र तो चाळिशीत आला आहे. त्यामुळे संघाने भविष्याचा विचार करता फाफ डू प्लेसिसला रिलीज केले आहे. त्यामुळे बंगळुरू पुन्हा विराटकडे नेतृत्वाची धुरा सोपवू शकते.
सनरायजर्सने क्लासेनला केले रिटेन
सनरायझर्स हैदराबादच्या ट्रॅव्हिस हेड, हेनरिक क्लासेन आणि अभिषेक शर्मा यांनी अक्षरक्ष: धुमाकूळ घातला. कमीत कमी चेंडू, जास्तीत जास्त धावा चोपण्यात हे त्रिकूट माहीर आहे. त्यामुळे संघाने कमिन्स, क्लासेन, हेड आणि अभिषेक शर्मा यांना रिटेन केले. यात हेनरिक क्लासेनला सर्वाधिक २३ कोटी रुपये मोजले.