मुंबई : प्रतिनिधी
मुंबई कुणाची? मराठी की अमराठी माणसांची हा वाद जुनाच आहे. पण आता मुंबई कोणत्या शिवसेनेची हा वाद पेटणार आहे. गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे गटाला भगदाड पाडण्याच्या वल्गना झाल्या. खासदार, आमदार फुटणार असल्याचा दावा करण्यात आला. अजून त्याचा मुहूर्त ठरला नसला तरी मुंबईत शाखा युद्ध रंगले आहे. वर्सोवा शाखेवरून उद्धव सेना आणि शिंदे गटात धुमशान सुरू आहे. वर्सोवा शाखेवरून मोठा तणाव वाढला आहे.
अंधेरी, वर्सोवातील कट्टर शिवसैनिक आणि नेत्या राजूल पटेल यांनी उद्धव ठाकरे गटाला रामराम ठोकला. त्यांचे या परिसरात मोठे कार्य आहे. महिला संघटनात त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी सोमवारी ‘मातोश्री’ला रामराम केला. विधानसभा निवडणुकीपासूनच त्या उद्धव सेना सोडतील अशी चर्चा रंगली होती.
ती आता खरी ठरली. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेच्या आक्रमक नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्या तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या.
शिवसेनेच्या माजी नगरसेवक राजूल पटेल यांनी शिंदे गटाकडे जाताना शिवसेनेच्या शाखेला टाळे ठोकले होते. राजूल पटेल यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याअगोदर शाखेला टाळे लावून चावी स्वत:कडे ठेवल्याने ठाकरे गटाचे पदाधिकारी शाखेबाहेर जमले होते. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कुलूप तोडून शाखेत प्रवेश केला. या वेळी अनिल परब स्वत: शाखेत उपस्थित होते, असे समोर येत आहे.
मीरा रोडवरून दोन्ही गट आमने-सामने
मीरा रोडमधील शिवसेना शाखेचा ताबा मिळवण्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आले आहेत. मीरा रोडच्या पूनम गार्डन परिसरातील शिवसेनेची शाखा अनेक वर्षांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ताब्यात आहे. २७ जानेवारी रोजी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख शिवशंकर तिवारी यांनी शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आणि शाखेवर आपला हक्क असल्याचा दावा केला. तिवारी यांच्या या दाव्यानंतर उद्धव गटाचे कार्यकर्ते संतप्त झाले असून दोन्ही गटांमध्ये वाद उफाळला आहे.
रत्नागिरीत ‘ऑपरेशन टायगर’
रत्नागिरीत ‘ऑपरेशन टायगर’ राबविल्यानंतर उद्धव ठाकरे सेनेकडून नवीन शिलेदारांची नियुक्ती करण्यात आली. उपजिल्हा प्रमुखपदी दत्तात्रय कदम तर महिला उपजिल्हा संघटक पदावर उल्का विश्वासराव यांची नियुक्ती केली. तर रत्नागिरी तालुकाप्रमुखपदी शेखर घोसाळे यांची नियुक्ती केली. लांज्याच्या महिला तालुका संघटक म्हणून पूर्वा मुळे यांची नियुक्ती, लांजा तालुका प्रमुखपदी सुरेश करंबळे यांची नियुक्ती केली. उद्धव ठाकरे सेनेचे सचिव विनायक राऊत यांच्या स्वाक्षरीने रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यातील नियुक्त्या करण्यात आल्या.