मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या काही निर्णयांमुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. कारण त्यांनी केवळ दहाच मिनिटांमध्ये कॅबिनेटची बैठक सोडली. अजित पवारांच्या नाराजीचा परिणाम महायुतीच्या नात्यामध्ये होईल का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
अजित पवारांच्या मनाजोगी गोष्ट झाली नाही अथवा त्यांना काही पटले नाही तर ते त्याजागी थांबत नाहीत, असे आजवर घडलेले आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही हेच घडले. कॅबिनेटमध्ये ३८ निर्णय घेण्यात आले. मात्र अजित पवार दहाच मिनिटांत निघून गेले. शेवटच्या क्षणाला महत्त्वाचे प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मांडत असल्यामुळे अजित पवार नाराज असल्याची माहिती आहे. त्यामुळे ते निघून गेले. मात्र तिथून पुढे अडीच तास ही बैठक चालली आणि अनेक निर्णय सरकारने घेतले. काही जमिनींसंदर्भात अर्थ विभागाने विरोध दर्शवल्यानंतरही कॅबिनेट बैठकीमध्ये ते विषय ऐनवेळी मांडण्यात आले, विविध संस्थांना जमिनी देण्यासंदर्भात निर्णय होत असल्याने अजित पवार नाराज होते अशी चर्चा आहे.
गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नॉन क्रिमिलेयरची उत्पन्नाची मर्यादा आठ लाखांवरुन पंधरा लाख रुपयांपर्यंत करण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस, घराच्या मागणीसाठी आंदोलन करणा-या वांद्रे शासकीय वसाहतीतील कर्मचा-यांना कायमस्वरूपी घर देण्याचा निर्णयही घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला असून गुरुवारी झालेल्या या बैठकीत ३८ निर्णय घेण्यात आले.
अजित पवार काय म्हणाले?
अजित पवारांच्या नाराजीचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर अजित पवारांनी यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, माझा नियोजित कार्यक्रम लातूर येथे होता. त्यासाठी मला विमानतळावर जाणे गरजेचे होते. कॅबिनेटची बैठक ११ वाजताची होती, परंतु ती नियोजित वेळेपेक्षा उशिराने सुरु झाली. त्यामुळे महत्त्वाच्या विषयांवरील चर्चेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन मी निघून गेलो असे त्यांनी सांगितले.