मुंबई (प्रतिनिधी) : दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी राज्य निवडणूक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी त्यांचे स्वागत केले. दिनेश वाघमारे यांची ५ वर्षांसाठी राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. राज्याचे सातवे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. यू. पी. एस. मदान यांचा कार्यकाळ ४ सप्टेंबर २०२४ रोजी संपल्यापासून हे पद रिक्त होते.
दिनेश वाघमारे यांनी इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीमध्ये बी. टेक. केले आहे. आयआयटी खरगपूरमधून त्यांनी संगणकशास्त्रात एम. टेक. तर यूकेमधून ‘विकास व प्रकल्प नियोजन’ या विषयात एम. एस्सी. केले आहे. १९९४ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेले वाघमारे यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे.
रत्नागिरीचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून वाघमारे यांच्या प्रशासकीय कारकीर्दीला सुरुवात झाली होती. वाशिम आणि यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी पद भूषविले होते. ते नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्षही होते.