मुंबई : जेष्ठ सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केल्यानंतर राज्यपालांनी त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. राज्यातील महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी नवीन निवडणूक आयुक्तांवर असणार आहे. दिनेश वाघमारे हे सचिव दर्जाचे अधिकारी आहेत.
मंत्रिपरिषदेने नव्या निवडणूक आयुक्तांची निवड करण्याचे सर्वाधिकार हे मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी दिनेश वाघमारे यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानुसार राज्यपालांची दिनेश वाघमारेंच्या नावाला मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने वाघमारेंच्या नियुक्तीचा एक आदेश जाहीर करण्यात आला आहे. दिनेश वाघमारे हे पुढच्या पाच वर्षांसाठी राज्याचे निवडणूक आयुक्त असतील. त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती मिळणार नाही.