26.6 C
Latur
Friday, June 28, 2024
Homeराष्ट्रीयदहशतवाद्यांना मदत करणा-यांना थेट मृत्यूदंड देणार

दहशतवाद्यांना मदत करणा-यांना थेट मृत्यूदंड देणार

जम्मू-काश्मीर पोलिसांकडून कठोर पाऊल पोलिस महासंचालक आरआर स्वेन यांची माहिती

श्रीनगर : गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी घटना पाहता दहशतवाद्यांना मदत करणा-यांवर कडक कारवाई करण्याची तयारी पोलिस करत आहे. दहशतवाद्यांची मदत करणा-यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तरतूद आहे. अशा लोकांवर ऍनिमी एजंट्स ऍक्टअंतर्गत कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक आरआर स्वेन यांनी दिली.

जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटना पाहता सरकार मोठे पाऊल उचलणार आहे. त्यामुळे दहशतवाद्यांना मदत करणा-यांवर ऍनिमी एजंट्स कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते. नुकतेच कठुआ, डोडा आणि रियासी सेक्टरमध्ये झालेल्या दहशतवादी घटनांमध्ये काही स्थानिक लोकांनी दहशतवाद्यांना मदत केल्याची माहिती समोर आली होती. यानंतर पोलिसांनी आता हा कठोर कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

बाहेरून येणा-या दहशतवाद्यांना मदत करणा-यांवर पोलिस कठोर ऍनिमी एजंट्स कायद्यांतर्गत कारवाई करू शकतात. शत्रू एजंट कायदा यूएपीएपेक्षा अधिक कडक आहे. कठुआ दहशतवादी घटनेचा तपास राज्य तपास यंत्रणा करत आहे तर रियासी दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे असे पोलिस महासंचालक आरआर स्वेन यांनी सांगितले.

ऍनिमी एजंट्स कायदा देशद्रोहापेक्षा कठोर मानला जातो. या कायद्यानुसार किमान शिक्षा जन्मठेप किंवा मृत्युदंड आहे. या कायद्यात शत्रूचे एजंट म्हणून काम करणा-या दहशतवाद्यांच्या सहका-यांचा उल्लेख आहे, जे बाहेरून येतात. दहशतवाद्यांना चकमकीत नक्कीच ठार केले जाईल. तर त्यांना मदत करणा-यांवर आता कठोर कारवाई करण्याची तयारी सुरू असल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी म्हटले आहे.

विशेष न्यायालये स्थापणार
तसेच या कायद्यांतर्गत अटक केलेल्या लोकांवर खटला चालवण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करण्यात येतील. दहशतवाद्यांना मदत करणा-यांना या कायद्यातून सुटता येणार आहे. या प्रकरणांची सुनावणी लवकर पूर्ण होईल आणि जन्मठेप किंवा फाशीच्या शिक्षेची तरतूद असल्याने हा अतिशय कठोर कायदा मानला जातो.

दहशतवाद्यांना पळून जाण्यात केली मदत
९ जून रोजी कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिरात यात्रेकरूंना घेऊन जाणा-या ५३ आसनी बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. चालकाला गोळी लागल्याने बस खड्ड्यात पडली. या दहशतवादी हल्ल्यात ९ जणांचा मृत्यू झाला तर ४१ जण जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी दहशतवाद्यांच्या एका साथीदाराला अटक केली. अटक केलेल्या आरोपींनी अनेकवेळा दहशतवाद्यांना आश्रय दिला होता आणि त्यांचा मार्गदर्शक म्हणून काम केले होते. ही व्यक्ती दहशतवाद्यांना अनेक वेळा आश्रय देत होती. अन्न आणि निवारा देण्याबरोबरच त्याने दहशतवाद्यांना घटनास्थळी पोहोचण्यास मदत केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR