21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeधाराशिवधाराशिव जिल्ह्यातील १० खेळाडूंची शासनसेवेत थेट नियुक्ती

धाराशिव जिल्ह्यातील १० खेळाडूंची शासनसेवेत थेट नियुक्ती

जिल्ह्याने घडविले राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू

धाराशिव : प्रतिनिधी
महाराष्ट्रासह देशाला विविध खेळातून सुवर्णपदक मिळवून देत राज्याची मान उंचावणा-या खेळाडूंना कोणतीही परीक्षा न देता, वा इंटरव्यू न देता राज्य शासनाने राज्यातील विविध खेळाडूंना थेट नियुक्ती देत सरकारी नोकरी दिली आहे. त्यामध्ये खो-खो खेळाची पंढरी समजली जाणा-या धाराशिव जिल्ह्यातील दहा खो-खो खेळाडूंना राज्य शासनाने थेट नियुक्ती देत सरकारी नोकरी दिली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खो-खो खेळाडू निकिता पवार व गौरी शिंदे यांची राजपत्रित अधिकारी वर्ग दोन पदी थेट नियुक्ती झाली आहे. राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती ऋतुजा खरे, संपदा मोरे, मयुरी पवार, प्रीती काळे, जानव्ही पेठे, किरण शिंदे, निखिल मस्के यांची वर्ग चार पदी थेट नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे खेळाडूंनी आभार मानले आहेत. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी घेतलेल्या विशेष परिश्रमामुळे अधिकाधिक खो-खो खेळाडूंना शासन सेवेत नोकरी लागण्यासाठी मदत झाली आहे.

शासने सेवेत रूजू झालेले हे सर्व खेळाडू धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आहेत. जिथे कोणत्याही अत्याधुनिक सुविधा नसताना धाराशिव जिल्ह्याच्या खो-खो मैदानावर सराव करत त्यांनी यश संपादन केले आहे. आजपर्यंत धाराशिव जिल्ह्याचे अनेक खो-खो खेळाडू शासन सेवेत थेट नियुक्ती झाले आहेत. यामध्ये आता नियुक्त झालेल्या खेळाडूंसाठी भारतीय महासंघाचे सहसचिव तथा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव प्रा.डॉ. चंद्रजीत जाधव यांनी घेतलेल्या अविरत परिश्रमामुळे हे यश मिळाले आहे, असे धाराशिव जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अनिल खोचरे, सचिव प्रवीण बागल यांनी सांगितले.

खो-खो मैदानावर प्रवेश घेतल्यापासून त्या खेळाडूंचे खेळासोबत जीवन घडवण्यापर्यंतची अनमोल जबाबदारी आमचे पालक म्हणून कायम आमच्या पाठीशी असणारे आमचे मार्गदर्शक प्रा. डॉ चंद्रजीत जाधव यांना आमचे सर्व श्रेय जाते, असे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेती खेळाडू निकिता पवार व गौरी शिंदे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR