सिल्लोड : प्रतिनिधी
तुमचे आमचे मतभेद असतील. त्याच्यासाठी माझ्याशी कुणी बोलायला तयार असेल तर मीही बोलायला तयार आहे. पण आता ही संधी आहे, अशी साद उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना घातली आहे. सिल्लोड येथील प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात सगळ्यांना एकत्र येण्याचं आवाहन केले.
आज इथं सगळे एकवटलेत, सर्व एकटवल्यानंतर समोर कितीही मोठा माणूस असू दे तो कोलमडून पडल्याशिवाय राहत नाही हा या देशाचा इतिहास आहे. मी भाजपला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगतोय ही संधी सोडू नका. आपली संस्कृती आणि आपले संस्कार वेगळे आहेत, मी भाजप कार्यकर्त्यांना आवाहन करतोय असं उद्धव ठाकरेंनी म्हटले.
दरम्यान, मी भगवा झेंडा घेऊन महाराष्ट्रात फिरतोय, आज माझ्यासमोर मुस्लीम भगिनी बसल्यात. त्यांना भीती का वाटत नाही, आम्ही हिंदुत्ववादी आहोत. हिंदुत्व सोडलं नाही तरीही एवढ्या गर्दीने माझ्या मुस्लिम भगिनी सभेला येऊन बसतात, त्यांना इथे भीती वाटत नाही बिनधास्त बसतात. उलट त्यांच्यापासून भीती वाटते. हेच तर आमचे हिंदुत्व आहे.
राजकारणात काहीही शक्य : फडणवीस
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्याचबरोबर निवडणुकीनंतरचे समीकरण कसे असणार? त्यावर चर्चा होत आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या टोकाचे मतभेद आहेत. परंतु ते पुन्हा एकत्र येऊ शकतात का? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी आश्चर्यकारक उत्तर देत भविष्याचे संकेत दिले. राजकारणात काहीही होऊ शकते, परंतु राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) याची गरज पडणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले.
महायुतीचाच विचार : दानवे
आमच्यापुढे दोन प्रश्न आहेत, हरवायचं कुणाला, आम्ही महाराष्ट्रातील जनतेला साद घालतोय. उद्धव ठाकरेंना हटविण्यासाठी आम्हाला साथ द्या, मात्र त्यांनी आम्हाला साद घातली अब्दुल सत्तार यांना हटवायला साथ द्या. हा पक्षांतर्गत प्रश्न आहे. या विषयावर मी फारसं भाष्य करणार नाही. मी भाजपचा राज्यातील प्रमुख आहे. एका जागेचा विचार करत नाही. महायुती एकत्रित असा विचार करतोय.