पंढरपूर : आषाढ एकादशी यात्रा १७ जुलै रोजी होत आहे. यादिवशी मुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक ‘श्रीं’ची शासकीय महापूजा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेला मोठ्या प्रमाणात वारकरी, भाविकांची गर्दी असते. ही यात्रा शांततेत व नियोजनबध्द पध्दतीने पार पडावी याकरिता व्यवस्थापनाच्यादृष्टीने आपत्ती मंदिर समितीच्या ३०० कर्मचारी, स्वयंसेवक यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
आषाढी यात्रेनिमित्त अप्पर जिल्हाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडरमोनिका सिंह ठाकूर यांनी दिलेल्या सूचनेनुसार अग्रिशमन, प्रथमोपचार, कंज्यूलिटी कॅरिंग मेथड व सेफ इव्ह्याकॉशनबाबत श्री संत तुकाराम भवन, पंढरपूर येथे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राचे दीप प्रज्वलन मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामध्ये संभाजी कारले यांनी अग्रिशमन, डॉ. अनिल काळे यांनी प्रथमोपचार तसेच बिमल नथवाणी, हनुमान चौधरी, किशोर आढळकर यांनी कॅज्युलिटी कॅरिंग मेथड व सेफ इल्ह्याकॉशनबाबत प्रशिक्षण दिले.
प्रशिक्षण हे यात्रेच्या कालावधीच्यादृष्टीने खूप उपयोगी होणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमास
मंदिर समितीकडील सुमारे ३०० कर्मचारी, स्वयंसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागप्रमुख विनोद पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विभागप्रमुख राजेश पिटले, सहाय्यक विभागप्रमुख राजकुमार कुलकर्णी, दादा नलवडे, भाऊसाहेब घोरपडे यांनी परिश्रम घेतले.यात्रेत भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता सर्वच जबाबदारी पोलिसबांधवांवर न सोपवता मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनीदेखील आपत्तीप्रसंगी महत्वाची भूमिका बजावावी यादृष्टीने मंदिर समितीच्या ३०० कर्मचाऱ्यांना दोन दिवस आपत्ती व्यवस्थापनाबावत प्रशिक्षण देण्यात आले आहे.असे मंदिर समिती कार्यकारी अधिकारी,राजेंद्र शेळके यांनी सांगीतले.