मुंबई : ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’च्या संशोधकांना पिलाला जन्म देणा-या सापसुरळ्यांच्या नव्या कुळाचा आणि पाच नव्या प्रजातींचा शोध लावण्यात यश आले आहे. पिलाला जन्म देणा-या सापसुरळीची ही भारतीय द्वीपकल्पामधील पहिलीच नोंद आहे. या संशोधनामध्ये ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक ईशान अगरवाल, तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकर यांचा सहभाग आहे.
जर्मनीमधून प्रकाशित होणा-या ‘व्हर्टिब्रेट्स झूलॉजी’ या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकातून या संशोधनावर शिक्कामोर्तब झाले आहे. नव्याने शोधलेल्या कुळाला ‘द्रविडोसेप्स’ असे नाव देण्यात आले आहे. ‘द्रविड’ या संस्कृत आणि ‘सेप्स’ या ग्रीक शब्दांवरून हे नामकरण केले आहे. दक्षिण भारतातील आढळक्षेत्रासाठी ‘द्रविड’ आणि सापसदृश ठेवणीसाठी ‘सेप्स’ यांच्या जोडणीतून कुळाचे नाव योजिले आहे.
अंड्यांऐवजी पिलंना जन्म देणे, डोळ्यांवरील खालच्या पापणीचे पारदर्शक असणे आणि जनुकीय संचाच्या वेगळेपणावरून द्रविडोसेप्स हे कुळ सबडोल्युसेप्स या कुळापासून वेगळे केले आहे. नव्याने शोधलेल्या पाचही प्रजाती या तामिळनाडू राज्यातील आहेत. द्रविडोसेप्स जिंजीएन्सीस, द्रविडोसेप्स जवाधूएन्सीस, द्रविडोसेप्स कलक्कडएन्सीस, द्रविडोसेप्स श्रीविल्लीपुथुरेन्सीस आणि द्रविडोसेप्स तामिळनाडूएन्सीस या पाचही प्रजातींचे नामकरण त्यांच्या आढळक्षेत्रावरून करण्यात आले आहे. रायोपा गोवाएन्सीस, सबडोल्युसेप्स पृदी आणि सबडोल्युसेप्स निलगिरीएन्सीस या तीन प्रजातींचे वर्गीकरणातील स्थान बदलून नव्याने शोधलेल्या कुळामधे निश्चित करण्यात आले आहे.