22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रात रंगली महिला उमेदवारांच्या लढतीची चर्चा

उत्तर महाराष्ट्रात रंगली महिला उमेदवारांच्या लढतीची चर्चा

भाजपकडून ४ तर काँग्रेसकडून एकाला संधी २० मे रोजी धुळे, दिंडोरीचे मतदान

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सर्वत्र जोरात सुरू आहे. या वेळीचे चित्र पाहता मोठ्या राजकीय पक्षांकडून महिलांना उमेदवारीची संधी देण्यात आली आहे. सर्वांत मोठ्या पक्षामध्ये मोजल्या जाणा-या भाजपने थेट लोकसभेच्या निवडणुकीत महिलांनाच अधिक प्राधान्य दिले आहे. त्यामुळे नाशिक विभाग म्हणजेच उत्तर महाराष्ट्राचा विचार केल्यास भाजपने चार तर काँग्रेसने एक असे पाच महिला उमेदवार दिले आहेत. विशेष म्हणजे या पाचही रणरागिणींसमोर पुरुष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने महिला उमेदवारांच्या लढतीची चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे.

दरम्यान, सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. नंदुरबार, रावेर व दिंडारी मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदारांनाच उमेदवारी घोषित करीत बाजी मारली. तर जळगावच्या उमेदवार घोषित करण्यात भाजपला बराच वेळ घ्यावा लागला.

त्यातच उमेदवारी घोषित झाल्यावरही उमेदवार बदलाच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर धुळे मतदारसंघात सक्षम उमेदवार काँग्रेसला मिळत नसल्याने थेट नाशिक येथील रहिवासी व माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना धुळे लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात पक्षाने उतरविले आहे. नाशिक विभागात नंदुरबारच्या डॉ. हीना गावित, रावेरच्या रक्षा खडसे व दिंडोरीच्या डॉ. भारती पवार या तिन्ही उमेदवार भाजपच्या विद्यमान खासदार आहेत.

डॉ. हीना गावित व रक्षा खडसे या दोघीही गेली दहा वर्षे आपल्या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. तर डॉ. भारती पवार या मागील पाच वर्ष नेतृत्व करीत आहेत. त्या केंद्रात आरोग्य राज्यमंत्री आहेत. या निवडणुकीत हे तिन्ही विद्यमान खासदार उमेदवार म्हणून भाजपने ‘जैसे थे’ ठेवले. तर जळगावसाठीही स्मिता वाघ यांच्या रूपाने खासदारकीसाठी आणखी एक महिला उमेदवार भाजपने दिला आहे.

भाजपच्या चार महिला निवडणुकीचे रणांगण गाजवित आहेत. तर काँग्रेसनेही डॉ. शोभा बच्छाव यांना धुळे लोकसभेसाठी उमेदवारी देऊन पाचव्या महिला उमेदवाराची भर घातली आहे. विशेष म्हणजे या पाचही महिला उमेदवारांसमोर पुरुष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पाचही महिला उमेदवार उच्च शिक्षित, लढवय्या व राजकीयदृष्ट्या सक्षम आहेत. यापैकी १३ मे रोजी चौथ्या टप्प्यातील नंदुरबार, जळगाव आणि रावेर लोकसभेचे मतदान पार पडले आहे.

आता २० मे रोजी पाचव्या टप्प्यात धुळे व दिंडोरीचे मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जूनला जाहीर होईल. त्यामुळे पाचपैकी किती महिला संसदेत उत्तर महाराष्ट्रातील जनतेची बाजू मांडण्यासाठी पोहोचतात, याकडे सा-यांचे लक्ष लागून आहे. मागील पाच वर्षे डॉ. हीना गावित, रक्षा खडसे व डॉ. भारती पवार या तिन्ही रणरागिणींनी संसदेत आपल्या मतदारसंघासाठी आवाज बुलंद केले होते. यावेळी काय घडते, त्याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR