सोलापूर : सोलापूर शहरात वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात सामना वाहनधारकांना करावा लागत आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेले ग्राहक आणि परगावाहून खरेदीसाठी सोलापूर शहरात आलेले ग्राहक यांची वर्दळ बाजारपेठेत वाढल्याने वाहनांची संख्या वाढून वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.
दरम्यान शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होते. असंख्य वाहने बाजारपेठेत येत असल्याने रस्त्यावर वाहने उभे केल्याने वाहतूक कोंडीला पेव फुटत आहे. याकडे मात्र वाहतूक शाखेच्या पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावर इतरत्र वाहने उभी केल्याने मुळात लांबीने मोठा असलेला रस्ता अरुंद होतो. त्यामुळे रस्त्यावर जाणाऱ्या वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते.
चाटी गल्ली येथे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची वर्दळ वाढल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांना रस्त्यावर ताटकळत थांबावे लागते. त्याच प्रमाणे मालवाहतूक ट्रक टमटम छोटा हत्ती असे विविध वाहने देखील रस्त्यावर उभे असतात त्यामुळे पाठीमागच्या वाहनांना पुढे जाण्यासाठी कसरत करावी लागते. शहरातील बाजारपेठेसाठी पार्किंगची सोय नसल्याने चार चाकी वाहने सर्रासपणे रस्त्यावर उभी केली जातात.
त्यामुळे अगोदरच अरुंद असलेला रस्ता आणखीन अरुंद होतो आहे. अशातच रस्त्यावरून जाणारी इतर वाहने यांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे.सणासुदीच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यावर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी व प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. यावेळी एखादा अपघात झाल्यास त्याला कोण जबाबदार ? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. वनवे असताना देखील बेधडकपणे आणि बेदरकारपणे वाहने चालवले जातात. अशावेळी वाहतूक शाखेचे पोलीस वाहनांवर कारवाई करत नाहीत. इतर वेळी वाहनांवर कारवाई केली जाते मात्र अशावेळी दुर्लक्ष केले जाते.