16.6 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमहाराष्ट्रकृषी पुरस्कारांचे रविवारी वितरण

कृषी पुरस्कारांचे रविवारी वितरण

मंत्री धनंजय मुंडेंची माहिती

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणा-या शेतकरी, व्यक्ती, संस्था तसेच अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणा-या कृषी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम उद्या म्हणजेच २९ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबई येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (डोम) वरळी येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

कोविड तसेच विविध कारणामुळे प्रलंबित असलेले राज्यातील सन २०२०, २०२१ व २०२२ या तीन वर्षातील एकूण ४४८ पुरस्कार राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, रोजगार हमी मंत्री दादाजी भुसे, मुंबईचे पालकमंत्री व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या कार्यक्रमांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार (१), वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार (८), जिजामाता कृषी भूषण पुरस्कार (८), कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार (८), वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार (८), उद्यान पंडित पुरस्कार (८), वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (४०), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार (१०), युवा शेतकरी पुरस्कार (८), अन्नधान्य, कडधान्य व गळीत धान्य पिकांच्या राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजनेतील पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.

कृषी पुरस्कारांच्या रकमेत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ४ पट इतकी घसघाशीत वाढ करण्याचा निर्णय फेब्रुवारी २०२४ मध्ये घेतला होता. तसेच पुरस्कार विजेत्यांना उपस्थित राहण्यासाठी दैनिक प्रवास भत्ता रकमेत सुद्धा वाढ करण्यात आली होती. या कार्यक्रमास शेतकरी-नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कृषी सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR