नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला युक्रेन दौरा आटोपून मायदेशी परतले असून, उद्या २५ ऑगस्ट रोजी ते जळगाव दौ-यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्या लखपती दीदी योजनेचा कार्यक्रम आयोजित केला असून राज्यातील ११ लाख महिलांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी केंद्र सरकारने ही नवीन योजना सुरू केली. राज्यात या योजनेचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगावात येणार असल्याचे ट्विट करूनन या कार्यक्रमात ११ लाख लखपती दीदींना प्रमाणपत्र वाटप करण्यात येईल, असे म्हटले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद मोदींचा जळगाव दौरा असल्याने जिल्ह्यात सर्वच सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घेतली जात आहे. तसेच राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांमुळे राज्यात संतापाची लाट आहे, त्या पार्श्वभूमीवरही खबरदारी घेतली जात आहे.
लखपती दीदी हा केंद्राचा कौशल्य विकास उपक्रम
लखपती दीदी हा एक महिलांसाठी कौशल्य विकास उपक्रम असून या योजनेद्वारे देशभरातील महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लखपती दीदी योजनेस पात्र असलेल्या महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी १ ते ५ लाख रुपयांचे कर्ज दिले जाते.
लखपती दीदी योजनेचा शुभारंभ
लखपती दीदी योजनेची राज्यातील सुरुवात तब्बल ११ लाख महिलांना प्रमाणपत्र देऊन करण्यात येत आहे. १५ ऑगस्ट २०२३ रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लखपती दीदी योजनेची घोषणा केली होती.