परभणी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व भारतीय खेल प्राधिकरण यांच्याकडून परभणी येथे चालणा-या खेलो इंडिया टेबल टेनिस प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंना गणवेशाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाकरिता अध्यक्ष म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून परभणीचे टेबल टेनिस खेळाडू चेतन सुरवसे उपस्थित होते. त्याचबरोबर बी रघुनाथ महाविद्यालयाचे उपप्राचार्य माधव पाटील आणि भारत सव सवंडकर उपस्थित होते. या कार्यक्रमात टेबल टेनिस खेळाडूंना ट्रॅक सूट टी-शर्ट शॉट्स आणि शूज यांचे वाटप जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांच्या हस्ते करण्यात आले. हे वाटप खेळाडूंच्या स्पर्धेतील सहभाग, निकाल, दररोजच्या सरावातील उपस्थिती या आधारावर देण्यात आले.
या खेळाडूंमध्ये अथर्व वैजवाडे, शौर्य सावंडकर, तनिष्कराज प्रधान, योगेश घुले, गौरांग वैजवाडे, युवराज सवणे, रुद्र पाटील, शिवनंदन पुरी, हुसेन खान पठाण, गौरव पत्तेवार, स्वप्नील आरसूळ, रोहित जोशी, हर्षवर्धन घाडगे, सौरभ मस्के, तुषार जाधव, पियुष रामावत, स्मित करेवार, साक्षी देवकते, साक्षी शिंपले, ओवी बाहेती, शरयू टेकाळे, अद्या बाहेती, कल्याणी सवंडकर, स्वरा पायघन, तनिष्का परतानी, शर्वरी जाधव, श्रीनिधी रुद्रवार, जानवी इंगळे, मैथिली इंगळे, वरदा देशमुख, काव्या केंद्रेकर यांचा समावेश आहे.
अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी खेळाडूंना सरावांमध्ये सातत्य ठेवत राष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन केले. तसेच सर्वांत महत्त्वाच्या चार स्पर्धा कोणत्या याची उकल करून दाखवली.
त्यात पहिली स्पर्धा ऑलिंपिक खेळ, दुसरी स्पर्धा जागतिक अंिजक्यपद स्पर्धा, तिसरी कॉमनवेल्थ स्पर्धा, चौथी आशियाई क्रीडा स्पर्धा असे सांगितले.
महत्त्वाच्या पहिल्या चार स्पर्धेचे टारगेट खेळाडूंनी ठेवावे मोठी स्वप्न पाहावी. पालकांनीही स्वत:चे पाल्यांसाठी योगदान द्यावे. खेळामध्ये करिअर करता येते. त्याबाबत अनेक उदाहरणे देऊन माहिती दिली. अव्वल दर्जाचे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू यांची माहिती प्रशिक्षण केंद्रात लावण्याबाबत सूचना दिल्या. खेळ खेळत असताना योग्य व्यायाम करावे. फिजिओथेरपीस्ट, सायकॉलॉजिस्ट, न्यूट्रिशियन यांचाही समावेश प्रशिक्षण दरम्यान असावा याबाबत माहिती दिली.