मुंबई : प्रतिनिधी
देवेंद्र फडणवीस यांना एकच गोष्ट सांगेन की, आम्ही त्या लोकांबरोबर ५५ वर्षे काढली आहेत. देवेंद्र फडणवीस, तुम्हाला आई तुळजाभवानीची शपथ आहे. या सापांना जवळ करू नका. या लोकांना कितीही जवळ घेतले तरी ते विष ओकल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला डसल्याशिवाय राहणार नाहीत. यांना सोबत घेऊ नका. ते तुमच्या पायावर डोके ठेवतील, काही झाले तरी त्यांना जवळ करू नका, या शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तिस-यांदा भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांत होणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर या भेटीचे महत्त्व वाढल्याचे म्हटले जात आहे. याआधी आदित्य ठाकरे यांनी नागपुरात अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या सलग भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. या भेटीबाबत शिवसेना शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. तसेच भाजपाला आवाहन केले जात आहे.
दिशा सालियान नावाच्या एका मुलीने आत्महत्या केली होती ते प्रकरण तुम्हाला माहीत असेलच, ते प्रकरण देवेंद्र फडणवीस यांनी बाहेर काढले तर यांना कठीण होऊन बसेल. या भीतीमुळे देवेंद्र फडणवीस यांना भेटणे सुरू आहे. केवळ आता स्वत:ला वाचवण्यासाठी देवा भाऊ… देवा भाऊ… असा जप करत आहे, अशी सडकून टीका रामदास कदम यांनी केली. दापोलीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते.