21.3 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्रमहायुतीत राहून विरोधात काम करु नका

महायुतीत राहून विरोधात काम करु नका

अमरावती : अमरावतीमधल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. ऐन निवडणुकीत राणा दाम्पत्य आणि विरोधकांमधील वाद उफाळून आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राणा दाम्पत्याला इशारा दिला आहे. महायुतीत राहून महायुतीविरोधात काम करणा-यांची नोंद घेतली जाणार असल्याचेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.

अमरावती भाजप कार्यालयात काही दिवसांपूर्वी बडनेराचे उमेदवार रवी राणा यांची बैठक झाली. त्यामध्ये रवी राणा यांनी अमरावतीची एक जागा कमी झाली तरी चालेल पण कमळ निवडून आले पाहिजे, असे वक्तव्य केले होते. राणांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांकडून त्यांची कानउघडणी करण्यात आली. राणा म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी सारखे वागत आहेत. त्यांच्याबद्दल न बोललेले बरे. त्यांच्या अशा बोलण्यानेच लोकसभेला त्यांच्या पत्नीचा पराभव झाला असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राणा दाम्पत्याचे कान टोचले आहेत.

महायुती मजबूतीने लढत आहे. महायुतीत कोणीही मिठाचा खडा टाकण्यात काम करू नका. मी राणा परिवारालाही सांगतो की, तुम्ही महायुतीचे घटक आहात. महायुतीत सरकार तुमच्या पाठीशी उभं राहिले आहे. सरकार आणण्यासाठी कॅप्टन अभिजीत अडसूळदेखील आपल्याला हवे आहेत. म्हणून आपण देखील महायुतीची शिस्त पाळली पाहिजे. महायुतीत राहायचे आणि महायुतीच्या विरोधात काम करायचे हे कोणी करता कामा नये. मुख्यमंत्री म्हणून मी हे आवाहन करत आहे असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

दर्यापूर मतदार संघाचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्यामध्ये काम करण्याची तळमळ आहे. अभिजीत अडसूळ यांना कॅप्टन म्हणणा-यांना कायमचे बाहेर पाठवून द्या. न थकता काम करणा-या अभिजीतला या ठिकाणी विजयी करायचे आहे. अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही अनेक निर्णय घेतले आहेत. अमरावती जिल्ह्यात संत्रा इस्टेट उभारत आहे. वैनगंगा नळगंगा प्रकल्प या दोन प्रकल्पाला सरकारने मान्यता दिली आहे. कॅप्टन अभिजीत अवश्य विधानसभेत पोहोचल्यास जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. लाडकी बहीण योजना सुपरहिट झालेली आहे. यामुळे विरोधकांची पायाखालची वाळू घसरलेली आहे. या लाडक्या बहिणीचे महायुतीचे सरकार पुन्हा आणणार आहेत. मात्र सावत्र व दृष्ट भावांपासून सावध राहा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR