नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी रात्री आपल्या राष्ट्रीय संघात शिस्त आणि एकजूटतेला प्रोत्साहन देण्यासाठी दहा सूत्रीय निर्देश दिले आहेत. यामध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक, दौ-यावर कुटुंबीय आणि वैयक्तिक स्टाफच्या उपस्थितीवर बंदी आणि मालिकेदरम्यान वैयक्तिक जाहिरातीवर बंदी यासारखे निर्देश दिले आहेत.
या नियमांचे पालन न करणा-या खेळाडूंवर दंड ठोठावण्यात येणार आहे. यामध्ये केंद्रीय करारामधील त्यांच्या मानधनामध्ये कपात आणि आयपीएलमधील सहभागापासून दूर ठेवणे, अशा कारवाईचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलिया दौ-यातील कामगिरीनंतर बीसीसीआयने निर्देशांची घोषणा केली आहे.
काय आहेत नियम?
– राष्ट्रीय संघातील प्रत्येक खेळाडूला देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य असेल.
– विदेशी दौ-यांमध्ये खेळाडूंसोबत कुटुंबीय सदस्य केवळ दोन आठवडे राहू शकतील.
– विदेशी दौ-यांमध्ये वैयक्तिक स्टाफ आणि व्यावसायिक फोटोशूटवर बंदी.
– दौरा सुरू असताना कोणत्याही खेळाडूला स्वतंत्रपणे प्रवास करण्याची परवानगी नसेल.
– दौरा किंवा सामना लवकर संपल्यानंतर खेळाडूंना लवकर परतण्याची मुभा मिळणार नाही.
– अपवादात्मक सूट मिळवण्यासाठी ३ निवड समिती अध्यक्ष आणि मुख्य प्रशिक्षकांद्वारे पूर्वसूचना द्यावी लागेल.
– या नियमावलीचे पालन न करणा-यांवर बीसीसीआयद्वारे योग्य कारवाई करण्यात येईल.
– कोणत्याही खेळाडूविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे सर्व हक्क बीसीसीआयकडे असतील.
– या हक्कांनुसार संबंधित खेळाडूला आयपीएलसह बीसीसीआयच्या सर्व स्पर्धांपासून दूर ठेवण्यात येईल.
– दोषी खेळाडूच्या केंद्रीय करारानुसार मिळणा-या सामना शुल्कात कपात करण्यात येईल.
भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी सीतांशू कोटक
सौराष्ट्रचे माजी फलंदाज सीतांशू कोटक यांना इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी गुरुवारी भारताचे फलंदाजी प्रशिक्षकपद देण्यात आले. कारण, ऑस्ट्रेलिया दौ-यावर सहायक प्रशिक्षक अभिषेक नायरची कामगिरी अपेक्षेनुसार नव्हती. ५२ वर्षीय कोटक दीर्घकाळापासून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) फलंदाजी प्रशिक्षक आहेत.