मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड पुकारल्यामुळे दीड वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले आहे. विशेष म्हणजे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. स्वत: अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी आपले कुटुंब एकत्र यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
तसेच राष्ट्रवादीच्या इतर दिग्गज नेत्यांकडून शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र आले तर आपण स्वागतच करु, शरद पवार हे आपले दैवत असल्याच्या भावना त्यांच्याकडून मांडण्यात आल्या. या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थित ही बैठक पार पडल्याची माहिती आहे. या बैठकीतील इनसाईड स्टोरी सूत्रांच्या माध्यमातून समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली.
निष्ठावानांचे काय?
जर शरद पवारांसोबत असणारे लोक आपल्यासोबत येणार असतील तर आधी जे अजित पवारांसोबत निष्ठावान राहिले त्यांचा विचार करावा. त्यांना विविध संधी द्याव्यात, अशी कार्यकर्त्यांनी आजच्या बैठकीत मागणी केली. २ जुलैला पक्षात फूट पडली त्यावेळी अजित पवारांवर विश्वास ठेऊन जे आले होते त्यांना टीकेचा सामना करावा लागला. त्यामुळे ज्यांनी टीकेची झळ सोसली. त्यांच्यावर अन्याय नको, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.