मुंबई : प्रतिनिधी
आपल्या देशातील मूळ प्रश्न बाजूला ठेऊन लोकांना जातीपातीच्या राजकारणात गुंतवले जात आहे. आपली तरूण पिढी याला बळी पडत आहे. धर्माच्या आधारे कोणतेही राष्ट्र उभारू शकत नाही, असे राज ठाकरे म्हणाले. जगातील सर्व देश धर्माला बाजूला करून विकासाकडे जात आहेत, पण आपण धर्माच्या दिशेने परत जात आहोत, असे राज ठाकरे म्हणाले. मनसेच्या वतीने शिवाजी पार्क येथे गुढी पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
धर्माच्या आधारे देश उभा करू शकत नाही हे पहिल्यांदा टर्की या देशाला समजले. त्या ठिकाणी केमाल पाशा आले आणि त्यांनी धर्मावर आधारित सत्ता बाजूला ठेवली. हे देश धर्मातून बाहेर पडत आहेत आणि आपण धर्माकडे जात आहोत. ज्यावेळी लाऊड स्पीकर बंद करा म्हटल्यावर आमच्या कार्यकर्त्यांवर केसेस दाखल केल्या. आता देवेंद्र फडणवीस म्हणतात की, आम्ही त्यावर कारवाई करणार. पण पाऊल मात्र उचलले नाही. त्या उत्तर प्रदेशात लाऊड स्पीकर बंद केली, असेही राज ठाकरे म्हणाले.
आम्हाला हिंदूत्व शिकवू नका
गंगेमध्ये अर्धवट जाळलेली प्रेते टाकली जातात. गंगेचे पाणी हे पिण्यासाठी नाही तर अंघोळीसाठीही योग्य नाही, असे राज ठाकरे म्हणाले. ज्यांना या गोष्टी कळत नाहीत, त्यांनी मला हिंदुत्व शिकवू नये, असेही राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.