अमरावती : प्रतिनिधी
महायुतीमध्ये असलेले अपक्ष आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेवरून केलेल्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली. यंदाच्या निवडणुकीत जर तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिलात तर या १५०० रुपयांचे ३००० रुपये होतील. पण जर आशीर्वाद दिला नाही तर मी पण तुमचा भाऊ आहे, हे १५०० रुपये परत घेईन, असे वक्तव्य त्यांनी केले.
यावरून रवी राणांवर टीकेची झोड उठत आहे. आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रवी राणा यांना विनोदातही लाडकी बहीणचे पैसे काढून घेण्याचे वक्तव्य करू नका अशी समज दिली आहे.
दरम्यान, राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा होत आहे. त्यातच रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, रवी राणा यांचे वक्तव्य अतिशय चुकीचे आहे. सरकारने आणलेली योजना आहे. विनोदात म्हटले असतील तरी ते चुकीचेच आहे. विनोदातही लाडकी बहीण योजनेचे पैसे काढून घेण्याचे वक्तव्य करू नका.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध
अपक्ष आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेतील निधीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेना ठाकरे गटातील महिलांनी आक्रमक होऊन तीव्र आंदोलन केले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या महिलांनी महायुती सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार रवी राणा यांचा प्रतिकात्मक पुतळा पायदळी तुडवला.