मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर जरी नाही केला तरी चालेल, पण बंद खोलीत का असेना मुख्यमंत्रीपदावर चर्चा व्हावी जेणेकरून ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री या निर्णयाने कोणी कोणाचे आमदार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावरून चर्चा जाहीरपणे करताना जो कोणी उमेदवार असेल त्याला जाहीर करा, माझा त्याला पाठिंबा राहील अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान, सध्या तरी मुख्यमंत्रीपदाच्या चेह-यावरून कोणतीही चर्चा नको असे काँग्रेसने ठणकावून सांगत या चर्चेला पुर्णविराम दिला आहे.
राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीसह महाविकास आघाडीकडून सुद्धा जोरदार तयारी सुरू आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुतीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असतानाच महाविकास आघाडीने निवडणुकीसाठी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आणि काँग्रेसकडून सावध भूमिका घेतली जात आहे. पहिल्यांदा काँग्रेसकडून या प्रश्नाला बगल देण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसकडून या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीमध्ये सध्या तरी मुख्यमंत्रीपदाच्या चेह-यावरून कोणतीही चर्चा नको अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काँग्रेस नेत्यांच्या या भूमिकेकडे कसे पाहतात आणि ते कोणता प्रतिसाद देणार याकडे लक्ष असेल. विधानसभा निवडणुकीसाठी एकत्रित सामोरे जाऊ आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेऊ अशी भूमिका काँग्रेसने त्यांनी मांडली आहे.
मविआला १५० ते १६० जागा मिळणार?
इंडिया टुडे-सी व्होटर्सच्या ‘मुड ऑफ नेशन’ सर्व्हेनुसार, महाविकास आघाडीला राज्यामद्ये १५० ते १६० जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवला गेला आहे. महायुती १२० ते १३० जागांवर पोहोचू शकते, असा अंदाज आहे. मतांची टक्केवारी पाहिली असता महायुतीला ४२ टक्के मतं मिळू शकतात तर महाविकास आघाडीला ४४ टक्के मते मिळतील, असा अंदाज आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ४३.७१ टक्के मते मिळवली होती, तर महायुतीला ४३.५५ टक्के मतं मिळवण्यात यश आले होते. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकांमध्ये देखील महाविकास आघाडीला यश मिळेल, असाच सर्व्हेचा अंदाज आहे. शिवाय, मविआला १५० ते १६० जागा आल्यास मविआची महाराष्ट्रात सत्ता देखील येऊ शकते. याशिवाय या सर्व्हेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केवळ ३.१ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.