बीड : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद गेल्याने पहिल्याच होणा-या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या बैठकीत जोरदार वाद झाल्याचे समोर येत आहे. भल्याभल्यांना आपल्या शाब्दिक हल्ल्यांनी शांत बसायला लावणा-या भाजपचे आमदार सुरेश धस यांना अजितदादांनी चांगले झापले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून २०२१ ते २०२२ या काळात कुठलीही विकासकामे न करता ७३ कोटी रुपये लाटल्याचा मुद्दा सुरेश धस यांनी बैठकीत मांडला. यावेळी, ‘तुम्ही लई मागचे बोलू नका, तुम्हाला जे म्हणायचे आहे, त्याची लेखी तक्रार करा,’असे सांगत अजितदादांनी सुरेश धस यांना सुनावत त्यांना फार वाव दिला नाही. बैठकीत प्रसारमाध्यमांना प्रवेश नव्हता. मात्र, बैठकीत अजितदादांनी सुरेश धस यांना सुनावल्याची चर्चा अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये रंगली होती.
बीडमधील कामे दर्जेदार झाली पाहिजेत
बैठकीत अजितदादा पवार म्हणाले, अधिका-यांनी कुणाच्याही दबावात काम करण्याची गरज नाही. पोलिसांच्या कामातही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. बीड जिल्ह्यातील कामे दर्जेदार झाली पाहिजेत. तुम्हाला कोणतीही अडचण आली, तर तुम्ही थेट माझ्या कार्यालयाशी संपर्क करा.
स्वतंत्र चौकशी करणार
बोगस पैसे उचलण्याचा मुद्दा उपस्थित केल्यावर अजितदादांनी सांगितले, ‘संबंधित प्रकरणाचे लेखी पत्र द्यावे.’ मी संपूर्ण लेखी पत्र तयार केले आहे. बीड जिल्ह्यात नियोजन समितीच्या निधीतून कुठलेही कामे न करता ७३ कोटी बोगस उचलण्यात आले आहेत. याची लेखी तक्रार मी केली नव्हती. आता मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहे. ७३ कोटी बोगस उचलल्याप्रकरणी स्वतंत्र चौकशी केली जाईल, अशी माहिती धस यांनी दिली.