कोहिमा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा बुधवारी चोथा दिवस असून त्यांची यात्रा मंगळवारी नागालँडमध्ये दाखल झाली आहे. नागालँडमध्ये भारत जोडो न्याय यात्रेचा चौथा दिवस पुन्हा सुरू झाल्यावर लोक मोठ्या संख्येने आले. दरम्यान, त्यांनी लोकांशी संवाद साधला. राजकारणात धर्म पाळला पाहिजे, पण धर्माच्या नावावर राजकारण करू नये, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, देशहितासाठी सर्वांच्या सहभागासह बंधुभावावर काँग्रेसचा विश्वास आहे. ते आस्तिक आहेत. धर्माचा वैयक्तिक फायद्यासाठी कधीही वापर केला जाऊ नये.
राहुल गांधी म्हणाले की, माझा हिंदुत्वावर विश्वास आहे, पण शो ऑफवर विश्वास नाही. मी माझ्या धर्माचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत नाही. मी माझे जीवन माझ्या धर्माच्या तत्त्वांनुसार जगण्याचा प्रयत्न करतो.
तसेच राहुल गांधी यांनी बुधवारी (१७ जानेवारी) नागा शांतता करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरले. पंतप्रधान मोदींना शांतता करारावर तोडगा काढता येत नसेल तर त्यांनी खोटे बोलायला नको होते, असे ते म्हणाले आहेत.
वृत्तसंस्थेनुसार, नागालँडच्या सर्वात प्रभावशाली संघटनांपैकी एक असलेल्या नागा होहोने राहुल गांधी यांची भेट घेतली. २०१५ मध्ये झालेल्या नागा शांतता कराराची अंमलबजावणी न झाल्याबद्दल संघटनेने राहुल यांच्याकडे चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, २०१५ च्या करारानुसार ठरलेल्या फ्रेमवर्कची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.
दुचाकीस्वारांची भेट
नागालँडमधील मोकोकचुंग जिल्ह्यात पक्षाच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान त्यांनी दुचाकीस्वारांची भेट घेतली. प्रवासादरम्यान त्यांनी दुचाकीस्वारांना भेटून त्यांच्याशी काही काळ संवादही साधला. मीडियाशी बोलताना एका बाईकस्वाराने सांगितले की, त्यांच्यात आणि राहुल गांधी यांच्यात बाईकशिवाय इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा झाली नाही. आमच्यात फक्त मोटरसायकलबद्दल चर्चा झाली. त्यांच्या लडाख दौऱ्याचीही चर्चा होती. आम्ही भारत जोडो न्याय यात्रेबद्दल बोललो नाही.