19.3 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रशासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील कंत्राटी प्राध्यापकांच्या मानधनात दुपटीने वाढ

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील कंत्राटी प्राध्यापकांच्या मानधनात दुपटीने वाढ

मुंबई : शासकीय दंत महाविद्यालय व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात येणा-या प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापकांच्या मानधनामध्ये दुपटीने वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने काम करणा-या प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापकांचे मानधन आता एक लाखाहून अधिक होणार आहे.

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व दंत महाविद्यालयांतील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांची सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती, पदोन्नती, राजीनामा व अन्य तत्सम कारणांमुळे पदे रिक्त होत असतात. परंतु रिक्त पदे नियमित स्वरूपात भरण्यास विलंब होत असल्याने रुग्णसेवा व शैक्षणिक कामकाजावर विपरीत परिणाम होऊन सेवा बाधित होते. त्यामुळे रुग्ण व विद्यार्थ्यांना फटका बसू नये यासाठी कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात अध्यापकांना नियुक्त करण्यात येते. कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात येणा-या सहयोगी प्राध्यापकांना प्रतिमहा ४० हजार रुपये, तर प्राध्यापकांना ५० हजार रुपये मानधन दिले जाते. मात्र अनेक वर्षे या अध्यापकांच्या मानधनामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती.

परिणामी सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापकांच्या तुलनेत पदव्युत्तर विद्यार्थ्यांना (निवासी डॉक्टर) अधिक मानधन मिळत होते. त्यामुळे राज्यातील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये कंत्राटी तत्त्वावरील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापकांच्या मानधनामध्ये दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता दंत व वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापकांचे मानधन ५० हजारांवरून १ लाख २० हजार रुपये तर सहयोगी प्राध्यापकांचे मानधन ४० हजारांवरून १ लाख १० हजार रुपये इतके वाढविण्यात आले आहे. मात्र कंत्राटी तत्त्वावरील अध्यापकांना इतर कोणतेही भत्ते मिळणार नसल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR