23.1 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeपरभणीपाथरी विधानसभेत डझनभर नेते उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार

पाथरी विधानसभेत डझनभर नेते उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार

मानवत : विधानसभा निवडणूकीचे बिगुल नुकतेच वाजले असून पाथरी विधानसभा मतदारसंघात डझनभर नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यामुळे पाथरी विधानसभेतून यावेळी आमदारकीची माळ कोणाच्या गळ्यात पडते. याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. विशेष गुडघ्याला बाशिंग बांधलेले उमेदवारांसह त्यांचे कार्यकर्ते देखील आपलाच उमेदवार कसा विजयी होणार याची आकडेमोड करताना दिसून येत आहेत.

२०१९ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तत्कालीन विद्यमान आ. मोहन फड यांना धक्का देत जिल्ह्यातील राजकारणाचे मुरब्बी नेते म्हणून ओळख असणा-या विद्यमान आ. सुरेश वरपूडकर यांनी बाजी मारली. यावेळी महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांत मुख्य लढाई असून महाविकास आघाडी कडून विद्यमान आ. सुरेश वरपूडकर यांना तिकीट पक्के असल्याचे बोलले जात आहे. महायुतीकडून मात्र माजी आमदार मोहन फड हे अचानक आजारी पडल्याने आता नेमकी उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात घालायची असा प्रश्न महायुतीला पडला आहे. महायुतीकडून गुडघ्याला बाशिंग बांधलेले शिवसेनेचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान हे आमदारकी लढवणार असल्याचे सांगत आहेत.

दुसरीकडे माजी आमदार मोहन फड यांच्या घरातून त्यांचे वडील माधवराव फड हे देखील निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे दाखवत आहेत. परंतू राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट महायुतीकडे सदर मतदारसंघ आपणास सोडण्यास व विटेकर यांना तिकीट पक्के असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे कोणाच्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ पडणार असा प्रश्न पडू लागला आहे. दुसरीकडे मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे यांच्याकडे मतदारसंघातील ब-याच कार्यकर्त्यांनी आपणास तिकीट मिळावे यासाठी खेटे घातल्याचे देखील सर्वश्रुत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून आपली चुणूक दाखवणारे डॉ. जगदीश शिंदे असो ही नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले दादासाहेब टेंगसे असो मनोज जरांगे यांच्या संपर्कात आहेत.

उमेदवारीची माळ गळ्यात पाडून घेऊन आमदारकी लढवण्यासाठी सज्ज असल्याचेही दिसून आले आहे. त्यातच काही दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीची दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये पाथरी मतदार संघासाठी छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक असलेले मानवत तालुक्यातील मानोली गावचे विठ्ठल तळेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून तिकीट न देता शांत बसवलेले सध्याचे उबाठाचे हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. संजयंिसह कच्छवे हे देखील अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत असून त्यांनी देखील भेटीगाठीवर भर दिला आहे. तसेच माजी आ. बाबाजानी दुर्राणी हे देखील दररोज मतदार संघातील गावागावात जाऊ गाठीभेटी घेत आहे. यावर त्यांची भूमिका अद्याप पर्यंत स्पष्ट नाही. ऐन वेळी ते अपक्ष म्हणून आपली उमेदवारी जाहीर करतात की महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणतात हा देखील प्रश्न अनुत्तरितच आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जातीय समीकरणाने मोठ्या प्रमाणात डोके वर काढल्याचे दिसून आले. त्यामुळे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत देखील जातीय समीकरण हेच आमदारकीचा कल देणार असा सूर मतदारांतून निघत आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघात एकूण मतदारांपैकी ३० ते ३५ टक्के मतदार हे मराठा समाजाचे आहेत. त्यांचा कल ज्या पक्षाकडे जाणार त्याच पक्षाचा आमदार होणार असे अधोरेखित झाल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR