नवी दिल्ली : वृत्तसंस्था
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या (शनिवारी) सकाळी ११ वाजता दिल्लीतील शक्तीस्थळाजवळ विशेष प्रोटोकॉलसह शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या कन्या शुक्रवारी रात्री उशिरा अमेरिकेहून दिल्लीत दाखल झाल्या. सध्या डॉ. मनमोहनसिंग यांचे पार्थिव दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. काल रात्रीच एम्समधून त्यांचे पार्थिव घरी आणले होते. तिथे शुक्रवारी दिवसभर अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनीही आज पार्थिवाचे दर्शन घेतले.
देशाची आर्थिक घडी बसविणारे अर्थतज्ज्ञ, देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे २६ डिसेंबर रोजी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान ९२ व्या वर्षी निधन झाले. डॉ. मनमोहनसिंग यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्यावर उपचारही सुरू होते. परंतु गुरुवारी रात्री अचानक त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे ते सायंकाळी घरी अचानक बेशुद्ध पडले. त्यामुळे त्यांना तात्काळ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याच दिवशी रात्री ९.५१ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. यानंतर देशभरात शोककळा पसरली.
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या स्मरणार्थ देशभरात सात दिवसांचा राजकीय दुखवटा पाळण्यात येत आहे. या कालावधीत संपूर्ण देशात राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जात आहे. या राजकीय दुखवटा काळात कोणतेही अधिकृत कार्यक्रम होणार नाहीत. दरम्यान, उद्या (शनिवारी) सकाळी ८ वाजता त्यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयात नेले जाईल. त्यानंतर सकाळी ८.३० ते ९.३० दरम्यान सर्वांना मनमोहनसिंग यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता काँग्रेस कार्यालयातून अंत्ययात्रेला सुरुवात होईल, असे सांगण्यात आले.
दिल्लीतील शक्तीस्थळाजवळ
डॉ. सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार?
देशाच्या माजी पंतप्रधानांचे अंत्यसंस्कार दिल्लीतील विशेष स्मृतीस्थळांवर केले जातात. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या माजी पंतप्रधानांवर दिल्लीतील राजघाट संकुलात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचबरोबर अनेक माजी पंतप्रधानांसाठी स्वतंत्र समाधीस्थळेही बांधली आहेत. डॉ. मनमोहनसिंग यांच्यावरही दिल्लीतील शक्तीस्थळाजवळच प्रोटोकॉलनुसार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते.
अंत्यसंस्काराच्या जागीच स्मारक उभारावे
मनमोहनसिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पक्षाच्या कार्यकारिणी समितीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणा-या पवित्र भूमीवरच त्यांचे स्मारक उभारावे, यासंबंधी एकमताने ठराव मांडण्यात आला आणि तशी मागणी पंतप्रधानांना पत्र लिहून करण्यात आली आहे.
कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली
देशाच्या प्रगतीत आणि अर्थिक विकासात डॉ.मनमोहनसिंग यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी दूरदृष्टीने अनेक योजना सुरू केल्या, त्याचा थेट फायदा सामान्य नागरिकांना झाला. डॉ. मनमोहनसिंग यांच्या निधनाने आपण एक असा नेता गमावला, जो हुशार आणि नम्रतेचे प्रतिक होता. मी व्यक्तिगतदेखील एक मित्र, तत्वज्ञ, मार्गदर्शक गमावला. त्यांनी आपल्या राष्ट्रीय जीवनात अशी पोकळी सोडली, जी कधीही भरून निघणार नाही. देशाच्या प्रगतीत त्यांचे योगदान अतुलनीय आहे, अशा शब्दांत कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी गौरवोद्गार काढले.