पुणे : प्रतिनिधी
अंमली पदार्थ निर्मिती करणा-यांविरोधात पुणे पोलिसांनी दोन दिवसांत दोन मोठ्या कारवाया केल्या आहेत. आधी मिठांच्या पुड्यांमध्ये एमडी विक्री करणा-या डिलरला अटक करण्यात आली तर आज सकाळी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत एका औषध निर्माण कंपनीत तब्बल ११०० कोटी रुपयांचे ६०० किलोपेक्षा जास्त एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले. या घटनेने पुण्यात मोठी खळबळ उडाली. पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी याबाबत माहिती दिली.
ड्रग्स तस्कर विरोधात पुणे पोलिसांनी फार्स आवळला. ड्रग्स तस्कर ललित पाटीलनंतर पुण्यात ही मोठी कारवाई झाली. दौंड कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत औषध निर्मिती करणा-या कंपनीच्या आड एमडी ड्रग्स बनवण्याचा प्रकार सुरू होता. याची माहिती पुणे पोलिसांना मिळताच कारवाई केली आहे. या प्रकरणी अनिल साभळे नावाच्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली.
पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार काल सोमवारी पुणे पोलिसांनी पुण्यातल्या विश्रांतवाडी येथून १०० कोटींपेक्षा अधिक एमडी ड्रग्स ताब्यात घेतले होते. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली होती. वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (रा. पुणे), अजय अमरनाथ करोसिया (३५, रा. पुणे) आणि हैदर शेख (रा. विश्रांतवाडी), असे ड्रग्स विक्री करणा-या आरोपींची नावे होती. हे मिठांच्या पुड्यांमध्ये भरून ड्रग्स विक्री करत होते. त्यांची कसून तपासणी केली असताना दौंड येथील फॅक्टरीची माहिती मिळाली.