नवी दिल्ली : उत्तर भारतासह ईशान्यकडील काही क्षेत्रांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. उत्तराखंड व हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीनंतर भूस्खलन झाल्याने व दरडी कोसळल्याने अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली. राजधानी दिल्ली व राजस्थानसह अनेक राज्यांत अतिमुसळधार पाऊस झाला. दक्षिण भारतातही पावसाचा जोर वाढल्याने, पुद्दुचेरी, तामिळनाडू व केरळ राज्यांतील काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अलर्ट जारी केला.
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात शुक्रवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. कमेडा, नंदप्रयाग व छिनका या क्षेत्रात दरडी कोसळल्याने महामार्ग बंद करण्यात आला. हिमाचल प्रदेशच्या बहुतांश क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. यादरम्यान भूस्खलन झाल्याने व अचानक पूर आल्याने या राज्यातील १२८ रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली. राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज असल्याने हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यासोबत १६ ऑगस्टपर्यंत तुफान पाऊस होण्याची भीती असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. वायव्य दिल्लीच्या मॉड टाउन क्षेत्रात शनिवारी झालेल्या पावसात दुमजली इमारत कोसळल्याने अनेक लोक ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बचाव अभियानादरम्यान ढिगा-याखालून बाहेर काढलेल्या तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. राजस्थानातही गत २४ तासांपासून तुफान पाऊस सुरू आहे.
दक्षिण भारतात पावसाचा जोर कायम
पुद्दुचेरीत शुक्रवारपासून पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुद्दुचेरीत रस्ते जलमग्न झाले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उत्तरेकडील पलक्कड व मलप्पूर जिल्ह्यासाठी रविवारपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तामिळनाडूतील १३ जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
बिहारमध्ये गंगा आणि गंडक नद्यांना उधाण
बिहारच्या बेगुसरायमध्येही गंगा नदीला उधाण आले आहे. शहरातील रस्त्यांवर नदीचे पाणी वाहत आहे. शनिवारी रात्री पाटणा, मोतिहारी, बेतिया, मुझफ्फरपूर, समस्तीपूर येथेही पाऊस झाला. त्यामुळे गंडक नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे.
दिल्लीत शाळेची भिंत कोसळली
दिल्लीत शनिवारी झालेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले होते. पालममधील रस्ते पावसाच्या पाण्यात बुडाले होते. दिल्लीतील डिचॉन भागातील एमसीडी शाळेची भिंत कोसळली आणि एक झाड उन्मळून पडले. या घटनेत दोन जण जखमी झाले असून दोन दुचाकींचे नुकसान झाले आहे.
ओडिशात वीज पडून २ जणांचा मृत्यू
१० ऑगस्ट रोजी ओडिशातील बालासोर जिल्ह्यात आकाशातून पडलेल्या विजेमुळे २ जणांचा मृत्यू झाला तर ३ जण दगावले. रायपीतांबर गावात हा अपघात झाला. हे सर्व लोक भातशेतीत काम करत होते.
कर्नाटकात भूस्खलन
कर्नाटकात पावसामुळे भूस्खलन झाले. म्हैसूर विभागातील सकलेशपूर आणि बल्लूपेट स्थानकांदरम्यान दरड कोसळल्याने मंगळुरू-बंंगळुरू दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. ५ गाड्या उशिरा आल्या. यापूर्वी ६ जुलै रोजी दरड कोसळली होती. त्यानंतर ८ ऑगस्ट रोजीच गाड्या पुन्हा सुरू करण्यात आल्या.