ताडकळस : येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी पद गत दोन महिन्यांपासून रिक्त आहे. सध्या या ठिकाणचा कारभार एक दिवस आड वझुर येथील पशुवैद्यकीय अधिकारी पाहत आहेत. त्यामुळे ताडकळस परिसरातील जवळपास २२ गावातील पशुपालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे तात्काळ लक्ष देऊन कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी पद भरण्याची मागणी पशुपालकांतुन होत आहे.
पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील पशुवैद्यकीय अधिकारी पद जुन, जुलै या दोन महिन्यांपासून रिक्त आहे. या ठिकाणी जुलै २०१५ पासून पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ.विश्वाभंर बिरादार हे कार्यरत होते. परंतु ते शासन नियमानुसार यावर्षी ३१ मे रोजी वयानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे येथील पशुवैद्यकीय अधिकारी पद रिक्त झाले आहे. सध्या या ठिकाणी वझुर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.राठोड यांच्याकडे अतिरिक्त पदभार दिला आहे. ते एक दिवस ताडकळस तर एक दिवस वझुर अशी एक दिवस आड सेवा देत आहेत.
ताडकळस पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत ताडकळस, सिरकळस, तामकळस, फुलकळस, महातपुरी, खांबेगाव, एकरुखा, बलसा बु, रामापुर, ईस्माईलपुर, माखणी, खडाळा, धानोरा काळे, कळगाव, कळगाववाडी, बानेगाव, महागांव, नवीन महागाव, निळा, नविन निळा, सिध्देश्वर नगर, सटवाई नगर या २२ गावातील पशुधनाच्या आरोग्य तपासणीत अडथा निर्माण होत आहे.
सध्या ताडकळस येथे मोठ्या प्रमाणात दुध डेअरी मार्फत दुध संकलन होत असल्याने अनेक शेतक-यांनी पुरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे. यासाठी २ ते ३ लाखांपर्यंत किमतींच्या म्हैस खरेदी केल्या आहेत. परंतु पशुवैद्यकीय अधिकारी पद रिक्त असल्याने जनावरांना वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यास अडचणी येत आहेत. या गंभीर समस्येकडे परभणी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी तात्काळ लक्ष देऊन ताडकळस येथील पशुवैद्यकीय अधिकारी पदाची कायम स्वरुपी पुर्तता करण्याची मागणी पशुपालकांतुन होत आहे.