जालना : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. जरांगेंनी उपोषणादरम्यान फडणवीसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. फडणवीसांचे राजकारण आणि मराठाद्वेष यावर त्यांनी भाष्य केले होते. त्यानंतर त्यांचे आरोप सुरूच आहेत.
मनोज जरांगेंनी आता फडणवीसांना आत्याची उपमा देत, ती कसे कान भरते, यावरून टीकास्त्र सोडले. माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले की, माझी हत्या करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा डाव आहे. माझ्या अंगावर कार्यकर्ते घालण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय. शिवाय पोलिसांना हाताशी धरून कान भरण्याचा उद्योग सुरू आहे.
देवेंद्र फडणवीसांनी एसपींचे कान फुंकले आहेत, पीआय, पीएसआय यांचेही कान फुंकले आहेत. गृहमंत्री हे जबाबदारीचे पद आहे. परंतु ते कान फुंकण्याचे काम करीत आहेत. ग्रामीण भागामध्ये पूर्वी मूल जन्माला आलं की आत्या त्याचे कान फुंकायची. सध्या देवेंद्र फडणवीस हे आत्याच्या भूमिकेत आहेत, अशी बोचरी टीका जरांगेंनी केली.
सरकारला पुढील आंदोलनाचा इशारा देत त्यांनी म्हटले की, राज्य सरकारने सगेसोय-याची अंमलबजावणी केली पाहिजे. ८ किंवा ९ तारखेपर्यंत आम्ही त्याची वाट बघू. नाहीतर ते किती दडपशाही करतात, ते बघून घेऊ. माझ्यावर हल्ला करण्याचा डाव रचला जातोय. कार्यकर्त्यांकडून किंवा महिलांच्या आडून हल्ला केला जाऊ शकतो. परंतु मी मागे हटणार नाही, आता बाहेर पडतोय. मी पण बघून घेणार आहे, असे म्हणत जरांगेंनी ९ तारखेपर्यंत सरकारच्या निर्णयाची वाट बघणार असल्याचे म्हटले आहे.